फळांची लाकडी प्रतिकृती तसेच लाकडी खेळणी विकणारी देशातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून सावंतवाडीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
सावंतवाडी- संस्थानकाळापासून सावंतवाडीची ओळख ठरली ती चितारआळीतील लाकडी खेळणी. फळांची लाकडी प्रतिकृती तसेच लाकडी खेळणी विकणारी देशातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून सावंतवाडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, अलीकडच्या काळात चिनी ड्रॅगनच्या तंत्रज्ञानामुळे बाजारपेठेतील खेळण्यांवरही चिनी खेळण्यांचे आक्रमण होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडीची ही ओळख कायम टिकवण्यासाठी लाकडी खेळणी व मूर्ती बनवण्याची कार्यशाळा येथील पंचम खेमराज महाविद्यालयात राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले यांच्या माध्यमातून सुरू आहे.
लाकडी मूर्तीना राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून १५ मे ते ३ जूनपर्यंत ही कार्यशाळा चालणार आहे. ३ जून रोजी कार्यशाळेत बनवलेल्या लाकडी मूर्तीचे भव्य राज्यस्तरीय प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कारागिरांसाठी ही पंधरा दिवसांची कार्यशाळा असून यात कर्नाटकातीलही ५ कारागीर सहभागी झाले आहेत. पुणे येथील प्रसिद्ध आर्टिस्ट राजू सुतार व वैशाली सुतार या कार्यशाळेत सहभागी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करत आहेत.
यापुढेही दर सहा महिन्यांनी ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे. लाकडी खेळण्यासाठी ‘पंगारा’सारख्या वजनाने हलक्या असलेल्या लाकडाचा मोठय़ा प्रमाणात उपयोग होतो. हे लाकूड सद्यस्थितीत दुरापास्त झाले असले तरीही या कार्यशाळेसाठी या आणि अशासारख्या काही लाकडांची उपलब्धता करण्यात आली आहे.
या लाकडांपासून आकर्षक अशा मूर्ती, मुखवटे, खेळणी, प्राण्यांच्या प्रतिकृती तयार केल्या जात आहेत. उत्कृष्ट कोरीवकामाचा नमुना येथे पहायला मिळत आहे. तयार होत असलेल्या या मूर्तीना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी किंमत मिळणार आहे. त्यामुळे पंधरा दिवस चालणा-या या कार्यशाळेत सिंधुदुर्गातील कारागिरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले यांनी केले आहे.