आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘नोकरी एक्स्प्रेस’ शुक्र वारी सावंतवाडीत दाखल झाली.
सावंतवाडी – आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘नोकरी एक्स्प्रेस’ शुक्र वारी सावंतवाडीत दाखल झाली. येथील आरपीडी हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या या उपक्रमाला नोकरी मेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले. २६० युवक-युवतींनी यावेळी मुलाखती दिल्या. त्यापैकी १५० जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. तर २३ उमेदवार प्रतीक्षायादीवर आहेत. शनिवारी नोकरी एक्स्प्रेस पुढील जिल्ह्यात रवाना होणार आहे.
राज्यातील बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष युवानेते आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून नोकरी एक्स्प्रेस हा उपक्रम गेली काही वर्षे राबविला जात आहे. गेले काही दिवस जिल्ह्यात नोकरी एक्स्प्रेस दाखल झाली होती. कणकवली, वैभववाडी, देवगड व मालवणनंतर शुक्रवारी नोकरी एक्सप्रेस शुक्रवारी सावंतवाडीत दाखल झाली. या नोकरी एक्सप्रेसच्या माध्यमातून स्थानिक बेरोजगारांना मुंबई, पुणे, गोवा येथे नोक-या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यासाठी सकाळपासूनच आरपीडी हायस्कूलच्या प्रांगणात शेकडो युवक-युवतींनी गर्दी केली होती.
यावेळी नोंदणीनंतर विविध कंपन्यांच्या माध्यमातून नोंदणीकृत युवतींच्या मुलाखती घेण्यात आल्या. निवड झालेल्या युवकांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली.
या उपक्रमाचे उद्घाटन माजी तालुकाध्यक्ष बाळा गावडे यांच्या हस्ते व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सावंतवाडी पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत, जि. प. सभापती गुरुनाथ पेडणेकर, माजी सभापती प्रमोद कामत, नोकरी एक्स्प्रेसचे मुख्य व्यवस्थापक विनय यादव, जि. प. सदस्य प्रकाश कवठणकर, शहर अध्यक्ष मंदार नार्वेकर, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, बांदा विभागीय अध्यक्ष राजन कळंगुटकर, माजी जिल्हा बँक अध्यक्ष गजानन गावडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नोकरी एक्स्प्रेसच्या माध्यमातून जिल्ह्यात ४१५ नियुक्तीपत्रे
आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नोकरी एक्स्प्रेसच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले चार दिवस उपक्रम राबविण्यात आला. कणकवली, वैभववाडी, देवगड, मालवण व सावंतवाडी येथे आयोजित केलेल्या या उपक्रमाला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातील ७८५ युवक-युवतींनी या उपक्रमात सहभाग घेतला. त्यातील ४१५ जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. तर ९८ उमेदवार प्रतिक्षा यादीत आहेत.