रुपयातील अवमूलनाने माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना फायदा होईल, या आशेने गुंतवणूकदारांनी आयटी कंपन्यांच्या शेअरची जोरदार खरेदी केली, ज्यामुळे मंगळवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये ६२ अंकांची वाढ झाली.
मुंबई- रुपयातील अवमूलनाने माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना फायदा होईल, या आशेने गुंतवणूकदारांनी आयटी कंपन्यांच्या शेअरची जोरदार खरेदी केली, ज्यामुळे मंगळवारी मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये ६२ अंकांची वाढ झाली आणि १९.८०४.०३ वर बंद झाला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही ९.६५ अंकांची वाढ झाली आणि तो ५,८५०.२० वर बंद झाला.
आयटी निर्यातदार कंपन्यांबरोबरच एफएमसीजी आणि धातू या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरलाही बाजारात मागणी होती. अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हची बुधवारी बैठक होणार आहे. यामध्ये रोखे खरेदी कमी करण्याबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले असल्याचे बोनांझा पोर्टफोलिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश गोयल यांनी सांगितले. त्याचबरोबर रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन हेही आपल्या कारकीर्दीतील पहिले पतधोरण जाहीर करणार असून त्याकडेही बाजाराचे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.
सेन्सेक्समधील १८ शेअर तेजीसह बंद झाले. यामध्ये आयटी सेवा निर्यातदार विप्रोच्या शेअरमध्ये ५.४१ टक्क्यांची वाढ झाली. तसेच डॉ. रेड्डी लॅब ३.६९ टक्के, टीसीएस २.३८ टक्के, जिंदाल स्टील १.९४ टक्क्यांनी वधारले. तर सन फार्मा ३.२२ टक्के, ओएनजीसी २.३ टक्के आणि एनटीपीसी १.७५ टक्क्यांची घट झाली.