अमेरिकेतील वॉशिंग्टन शहताली नौदलाच्या मुख्यालयात सोमवारी झालेल्या गोळीबारात एका हल्लेखोरासह १३ जण ठार झाले.
वॉशिंग्टन- अमेरिकेतील वॉशिंग्टन शहताली नौदलाच्या मुख्यालयात सोमवारी झालेल्या गोळीबारात एका हल्लेखोरासह १३ जण ठार झाले. या गोळीबारात दहा जण जखमी झाले असून त्यात एका पोलिस अधिका-याचा समावेश आहे.
या हल्ल्यात ठार झालेले बहुतांशी लष्करी कंत्राटदार असून हल्लेखोराची ओळख पटली आहे. त्याचे नाव अॅरॉन अलेक्सिस (३४) आहे. गेल्या चार महिन्यांपासून तो नौदलात मुख्यालयात काम करतो. त्याची वागणूक चांगली असल्याचे अधिका-यांनी सांगितले. तो टेक्सासमधील फोर्ट वर्थ येथील सैन्याचा ठेकेदार होता. कोणाकडूनतरी ओळखपत्र घेऊन तो या इमारतीत घुसल्याचे वॉशिंग्टनचे उपमहापौर विन्सेंट ग्रे यांनी सांगितले. या हल्ल्यामागे नेमका काय उद्देश होता हे आताच सांगू शकत नसल्याचे ते म्हणाले.
विशेष म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊस आणि कॅपिटल हाऊसपासून नौदलाचे मुख्यालय अगदी जवळ आहे.
या हल्ल्यात आणखी दोघेजण असल्याचा पोलिसांना संशय असून पोलिस कसून तपासणी करत आहेत. यातील एक ५० वर्षीय संशयित सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून त्याने लष्करी पद्धतीचा ऑलिव रंगाचा गणवेश परिधान केला आहे. या आफ्रीकन- अमेरिकन माणसाला शोधण्यासाठी पोलिस जंगजंग पछाडत आहेत.
शहरातील नौदलाच्या मुख्यालयात सकाळी आठ वाजून २० मिनिटांनी तिघांनी गोळीबार केल्याचे नौदलाने म्हटले आहे. या गोळीबारात जखमी झालेल्या पोलिस अधिका-याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नौदलाच्या मुख्यालयाच्या या इमारतीत तीन हजार जवान आणि नागरिक काम करतात. इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले असल्याचे वॉशिंग्टनच्या शहर पोलिस प्रमुख कॅथी लानियर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच येथील नागरीक, व्यापारी आणि समाजातील लोकांनी तातडीने सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, कारवाई पूर्ण होईपर्यंत या भागात येऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
या हल्लेखोरांबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्वरीत आमच्याशी संपर्क साधा, असे आवाहन एफबीआयतर्फे वलरी पार्लेव्ह यांनी केले आहे. कायदा व सुव्यवस्था, सैन्य दल आणि पोलिस अधिकारी याप्रकरणी एकत्र कारवाई करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या हल्ल्याचे अपडेट अध्यक्ष बराक ओबामा यांना देण्यात येत असल्याचे नौदलाने म्हटले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव वॉशिंग्टन विमानतळावरून सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली असून या भागातील शाळा, कॉलेज आणि महामार्ग बंद ठेवण्यात आले आहेत.
अमेरिकेत गोळीबारात मृत्यू झालेल्या आपल्या कर्मचा-यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी राजधानीत अमेरिकेचा राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. मृतांमध्ये एका विष्णू पंडित या भारतीय-अमेरिकन नागरिकाचा समावेश आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी या घटनेचा निषेध केला आहे.