बॉलिवूडचा प्रसिध्द गायक सोनू निगम अंडरवर्ल्डच्या रडारवर आला आहे. सोनूला अंडरवर्ल्डकडून धमक्या मिळत आहेत.
मुंबई – बॉलिवूडचा प्रसिध्द गायक सोनू निगम अंडरवर्ल्डच्या रडारवर आला आहे. सोनू निगमला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजला जाणारा छोटा शकीलकडून धमक्या मिळत आहेत.
सोनूने त्याला मिळणा-या धमक्यांसदर्भात मुंबई पोलिसांशी संर्पक साधला आहे. पुढल्यावर्षी सोनू निगम वर्ल्ड टूरसाठी जाणार आहे. यासाठी सोनूने एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीबरोबर करार केला आहे. हा करार रद्द करण्यासाठी सोनूला छोटा शकील फोनकरुन, मॅसेज पाठवून धमक्या देत आहेत.
आपल्या मर्जीतील कंपनीबरोबर करार करावा यासाठी सोनू निगमवर छोटा शकीलकडून दबाव आणला जात आहे. यासाठी सोनू निगमला त्याचे वैक्तीगत आयुष्यही उघड करण्याची धमकी देण्यात आली आहे.
करार रद्द केला नाहीस तर, मुंबईतील नामवंत कुटूंबातील प्रभावशाली महिलांबरोबरचे तुझे मैत्रीपूर्ण संबंध जगजाहीर करु अशी धमकी सोनूला देण्यात आली आहे. सोनू निगम सध्या नियोजित कार्यक्रमासाठी मुंबईबाहेर आहे, त्यामुळे त्याने अद्याप तक्रार दाखल केलेली नाही.
सोनूकडून रीतसर तक्रार आल्यानंतर त्याला पोलिस संरक्षण देण्यात येईल. अंडरवर्ल्डकडून धमकी मिळालेला सोनू निगम हा बॉलिवूडमधला पहिला कलाकार नाही. यापूर्वीही अंडरवर्ल्डने आपल्या आर्थिक फायद्यासाठी अनेक कलाकारांना वेठीस धरले आहे.