सोशल नेटवर्किंगमध्ये प्रसिद्ध असलेले ऑर्कुट संकेतस्थळ ३० सप्टेंबरपासून बंद करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे.
सॅनफ्रान्सिस्को- सोशल नेटवर्किंगमध्ये प्रसिद्ध असलेले ऑर्कुट संकेतस्थळ सोशल मीडियातील स्पर्धेमुळे मागे पडले. फेसबुक, ट्विटर, जी प्लस आणि अन्य सोशल नेटवर्किंग साईट्समुळे मागे पडलेले ऑर्कुट आता ३० सप्टेंबरपासून बंद करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे.
१० वर्षांपूर्वी गुगलने ऑर्कुट ही सोशल नेटवर्किंग साईट इंटरनेट विश्वात आणली. त्यावेळी काही वर्षांतच ऑर्कुट जगभरात लोकप्रिय झाले. मात्र गेल्या पाच सहा वर्षांपासून फेसबुक, ट्विटर यासारख्या साईट्सनी ऑर्कुटला मागे टाकले. त्यातच २०११ मध्ये गुगलने गुगल प्लस ही नविन सोशल नेटवर्किंग सुविधा सुरु केली.
यूट्युब, ब्लॉगर आणि गुगल प्लस या सेवांना मिळत असलेला वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन या सेवांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मागे पडलेले ऑर्कुट बंद करत असल्याची घोषणा गुगलचे संचालक पॉलो गोल्घेर यांनी सोमवारी ब्लॉगवर केली आहे.
३० सप्टेंबर २०१४ पासून ही सुविधा बंद करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. मात्र सध्याच्या युजर्सचे नुकसान होऊ नये यासाठी साइट बंद झाल्यानंतरही २०१६ पर्यंत युजर्स त्यांच्या प्रोफाइलमधील डेटा ट्रान्स्फर वा काढून घेऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.