बदलत्या काळानुरूप आज अनेक घरांमध्ये मुलांची वेगळी खोली पाहावयास मिळते. ती नसेल तर निदान अभ्यासासाठी छोटी स्टडी रूम असते. या अभ्यासखोलीमध्ये हमखास पाहायला मिळतं ते स्टडी टेबल. वरकरणी एक साधी वस्तू वाटणारं हे टेबल मुलांच्या अभ्यासातील महत्त्वाचा घटक असतं. ते जर अस्ताव्यस्त असेल, पसरलेलं असेल, विस्कटलेलं असेल तर मुलांनाच काय आपल्यालाही तिथं बसायचा कंटाळा येतो. म्हणूनच स्टडी टेबल हे नेहमीच नीटनेटकं आणि स्वच्छ असावं, त्यामुळे अभ्यास करायला उत्साह येतोच पण मन एकाग्र व्हायलाही वेळ लागत नाही. स्टडी टेबलच नव्हे तर मुलांची स्टडीरूमही अशाच प्रकारे नीटनेटकी आणि प्रसन्न हवी.
मुलांचा अभ्यास हा आजकाल मुलांपेक्षा पालकांना जास्त तापदायक ठरतो आहे. कारण अनेक मुलांना एकाग्रपणे अभ्यास करणे जमत नाही किंवा तसे वातावरण घरात मिळत नाही. अमेरिकेतील प्रसिद्ध लेखक मार्क ट्वेन यांना त्यांच्या गरिबीमुळे बहिणीकडे राहून अभ्यास करावा लागत होता. सभोवतालचा गोंगाट ऐकू येऊ नये म्हणून त्यांनी घरातील एका कोप-यात आपले स्टडी टेबल ठेवले होते. आपलं स्टडी टेबल स्वच्छ राहावं, यासाठी ते नेहमीच काळजी घेत असतं. त्यावर अवास्तव सामान किंवा पसरलेले कागद कधीही नसायचे.
तिथेच बसून त्यांनी विश्वविख्यात कादंब-या लिहिल्या, ज्यामधे ‘लाइफ ऑन द मिसिसिपी’, ‘अ कनेक्टिकट यांकी इन किंग आर्थर्स कोट’ आणि ‘अॅडव्हेंचर्स ऑफ हकलबेरी फिन’ या प्रमुख कादंब-यांचा समावेश होतो. मार्क त्यांच्या स्टडी टेबलची इतकी काळजी का घ्यायचे याचं उत्तर आश्चर्यकारक आहे. अभ्यास आणि लेखनासाठी एकाग्रता यावी, यासाठी ते स्टडी टेबलची काळजी घेत असत. आपण आपला अभ्यास हा स्टडी टेबल आणि खुर्चीवर बसून करतो. त्यामुळेच त्याची सजावट आणि स्वच्छता अशा प्रकारे असावी की, अभ्यास करताना मन एकाग्र व्हावे, प्रसन्न वाटावे आणि डोळे आणि पाठीलाही जास्त त्रास होऊ नये.
स्टडी टेबल
आजकाल डिझायनर स्टडी टेबलची खूप चलती आहे. आईवडिलांबरोबर जाऊन मुलं आपल्या पसंतीचं स्टडी टेबल खरेदी करू शकतात. तुमच्या जवळ जर एखादं जुनं स्टडी टेबल असेल आणि ते चांगल्या अवस्थेत असेल तर त्यानंही काम चालू शकतं. फक्त प्रश्न असतो की ते सजवायचं कसं? तज्ज्ञ सांगतात की, स्टडी टेबलवर पुस्तकांचा रॅक, पेन स्टँड किंवा फोल्डर ठेवण्याऐवजी ते टेबलाच्या कडेला असलेल्या भितीला टांगून ठेवावेत. नाहीतर अभ्यास करताना या वस्तूंकडे मुलांचं लक्ष जाऊ शकतं. अनेक ड्रॉवर आणि ट्रे असणारं टेबल मुलांसाठी फायदेशीर ठरतं. यामध्ये मुलांचं आवश्यक सामान योग्य प्रकारे ठेवता येतं. मुलं अभ्यासाला बसणारी खुर्चीही साधी आणि आरामदायक असावी. ती जर खुर्ची खूप टणक असेल तर अभ्यास करताना मुलांची पाठ दुखू शकते.
- पुस्तकांचा रॅक : आजकाल भिंतीवर साइडबोर्ड लावलेले असतात, त्यामध्ये मुलं आपली पुस्तकं ठेवू शकतात किंवा तुम्ही मुलांच्या आवडीनुसार पुस्तकांसाठी एखादं रॅक खरेदी करू शकता. हा पुस्तकांचा रॅक स्टडी टेबलच्या जवळच भिंतीवर टांगलेला ठेवावा म्हणजे मुलांना आवश्यकतेनुसार त्यातील वह्या, पुस्तकं पटकन् घेता येतील अन् ठेवताही येतील. रॅकमध्ये पुस्तकं विषयाप्रमाणे वेगवेगळी ठेवावीत. उदाहरणार्थ : फिजिक्सची वही, पुस्तकं, प्रोजेक्ट वर्क इत्यादी एका ठिकाणी ठेवावं. तसंच केमिस्ट्रीचीही वही, पुस्तकं, प्रोजेक्ट वर्क एका ठिकाणी ठेवावं. मुलांना एखादं पुस्तक किंवा वस्तू तुम्ही जेथून घ्याल तिथंच ती पुन्हा ठेवण्याची सवय लावा. त्यामुळे पुस्तकांचा रॅक व्यवस्थित राहीलच आणि त्यांना आवश्यक असणारं कोणतंही पुस्तक चटकन सापडेल. तसं न झाल्यास चिडचिड होऊन मुलांच्या मनाचं संतुलन ढळू शकतं.
- पेन स्टँड : मुलांच्या पुस्तकांच्या रॅकमध्ये पेनस्टँडसाठी वेगळी जागा तुम्ही बनवू शकता. ग्लास, लाकूड, प्लास्टिक किंवा मेटलपासून बनविलेलं पेनस्टँड अतिशय सुंदर असतात. जर तुम्ही क्रिएटिव्ह असाल तर पेनस्टँड रंगीत ग्लास पेपरनंही सजवू शकता किंवा त्याला वेगवेगळ्या स्टिकर्सनेही सजवता येते. कलर्स, क्रेयॉन, जॉमेट्री बॉक्स हे साहित्य टेबलच्या एका ड्रॉवरमध्ये ठेवा. दुस-या ड्रॉवरमध्ये टय़ुशनच्या वह्या, मॉडेल क्वेश्चन पेपर इत्यादी साहित्य ठेवा. ट्रेमध्ये वेगवेगळ्या विषयांचं चार्ट पेपरचं फोल्डर आणि महत्त्वाचे कागद ठेवा.
- टेबल लँप : मुलांच्या स्टडी टेबलवर टेबल लँप असलाच पाहिजे. टेबल लँप आणि स्टडीरूममधील लाइट यांची निवड योग्य प्रकारे करा. असा टेबल लँप निवडा जो टेबलची कमी जागा व्यापेल आणि स्टाइलिशही असेल. लँपचा प्रकाश चांगला असेल याची काळजी घ्या. त्याचबरोबर या प्रकाशाचा डोळ्याला त्रास होणार नाही, हेही पाहा. मुलांचं स्टडी टेबल अशा ठिकाणी असावं, जिथे दिवसा नसर्गिक प्रकाश भरपूर येत असेल. सीएफएल टय़ुबनेही रूममध्ये चांगला प्रकाश पडतो. परंतु तो व्यवस्थित ठिकाणी बसवलेला असणं आवश्यक आहे.
- सामान व्यवस्थित ठेवा : ब-याच मुलांच्या स्टडीरूममध्ये प्रवेश केला की चिडचिड होते. त्यांच्या स्टडी टेबलवर पुस्तकं अस्ताव्यस्त पडलेली असतात, सॉक्स काढून फेकलेले असतात, स्कूल बॅगही कोठेतरी कोप-यात पडलेली दिसते आणि ब-याचदा ओल्या टॉवेलचा तर इतका उग्र वास येत असतो की विचारू नका. पण याउलट काही मुलं याबाबत दक्ष असतात. त्यांच्या स्टडीरूममध्ये गेल्यानंतर तिथं काही काळ थांबावं असं वाटतं. अशा रूममध्ये स्टडी टेबल स्वच्छ असतं, भिंतीवरील पुस्तकांच्या रॅकमध्ये पुस्तकं अतिशय व्यवस्थित ठेवलेली दिसतात. मुलांचं स्टडी टेबल अस्ताव्यस्त असेल तर रूमही अस्ताव्यस्त दिसतेच पण अभ्यास हा मुलांसाठी खूप मोठं ओझं आहे, असं वाटतं. त्यामुळे टेबलवर पुस्तकं, वह्या, कागद पसरवून ठेवू नका. सगळं सामान योग्य त्या ठिकाणी व्यवस्थित ठेवा.
स्टडी टेबलसाठी टिप्स
घरातील कोणत्याही कोप-यात तुम्ही मुलांचे स्टडी टेबल ठेवू शकता. फक्त तिथं गोंगाट नसावा आणि चांगला उजेड असावा.
स्टडी टेबलच्या जवळपास जर एखादं सुकलेलं रोप असेल तर ते काढून टाकून तिथं एक हिरवगार ताज रोप लावावं.
जर टेबलच्या समोर लक्ष विचलित करणारं पोस्टर किंवा चित्र लावलं असेल तर ते काढून टाका. त्याऐवजी अभ्यासाचा चार्ट पेपर किंवा टाइमटेबल लावू शकता.
पेन, पेन्सिल, पट्टी, रबर, शार्पनर इत्यादी सर्व गोष्टी टेबलच्या ड्रॉवरमधे ठेवा म्हणजे अभ्यास करताना सारखं मुलांना उठावं लागणार नाही.
मुलांना बेडवर झोपून वाचण्याची सवय असेल तर ती खोडून काढा. कारण त्यामुळे झोप येते.
स्टडी टेबल अथवा मुलं बसत असलेली खुर्ची आणि टेबल यांची उंची योग्य असावी. खुर्चीवर नेहमी ताठ बसण्यास मुलांना शिकवावं.
एकूणच, स्टडी टेबल हे नेहमीच नीटनेटकं आणि स्वच्छ असावं, त्यामुळे अभ्यास करायला उत्साह येतोच पण मन एकाग्र व्हायलाही वेळ लागत नाही.