खा. नारायण राणे, माजी खा. निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती, ५ सप्टेंबपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हय़ात २ लाख सभासद नोंदणीचे उद्दिष्ट
सिंधुदुर्ग – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ २० ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हय़ात होत आहे. हा शुभारंभ सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन येथे दु. ३ वा. पक्ष संस्थापक अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री तथा खा. नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पक्षाचे सरचिटणीस माजी खा. निलेश राणे यांची उपस्थिती असेल.
शुभारंभानंतर ५ सप्टेंबपर्यंत २ लाख सभासद नोंदणी करण्याचे उद्दिष्ट जिल्हा कार्यकारिणीमध्ये ठरवण्यात आल्याची माहिती पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई उपस्थित होते. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक गुरुवारी सिंधुदुर्गनगरी येथे झाली.
‘जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये स्वाभिमान पक्षाच्या सभासद नोंदणी शुभारंभ या प्रमुख विषयावर प्रामुख्याने चर्चा झाली. संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाची सभासद नोंदणी करण्यात येणार असून त्याची सुरुवात २० ऑगस्ट रोजी केली जाणार आहे. ही मोहीम ५ सप्टेंबपर्यंत राबवली जाणार असून २ लाख सभासद नोंदणी करण्याचे यावेळी ठरवण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हय़ात महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा एक नंबरचा पक्ष आहे. ते सिद्ध करणारी ही सभासद नोंदणी असणार आहे. पक्षाला अपेक्षित असलेल्या सभासद नोंदणीचा आकडा पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येईल,’ असे दत्ता सामंत यांनी यावेळी सांगितले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ व सिंधुदुर्ग जिल्हय़ातील तिन्ही विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निवडून आणणे, हा पक्ष कार्यकर्त्यांचा निर्धार आहे. यासाठी पक्ष बळकट करण्यावर भर देण्यात आला आहे. याचसाठी पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे उद्दिष्टापेक्षा जास्त सभासद नोंदणी करण्यात येणार आहे, असेही जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी सांगितले.