मोदी यांचा उदो उदो करण्याची जी लाट भाजप नेते व कार्यकर्त्यांमध्ये आली आहे त्या नादात ते आता देवांपेक्षाही मोदी यांना मोठे मानू लागले आहेत.
अहमदाबाद- भाजप नेते नरेंद्र मोदी यांचा उदो उदो करण्याची जी लाट भाजप नेते व कार्यकर्त्यांमध्ये आली आहे त्या नादात ते आता देवांपेक्षाही मोदी यांना मोठे मानू लागले आहेत. त्यामुळेच त्यांनी मोदी यांच्या स्तुतीसाठी ‘हर हर मोदी’ ही नवी घोषणा तयार केली आहे. मात्र, त्यांची ही घोषणा वादाच्या भोव-यात सापडली आहे.
या घोषणेला द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्याकडे या संदर्भात निषेध नोंदवला असून, ‘व्यक्तिपूजा थांबवण्याची मागणी केली आहे. ‘हर हर महादेव’ हा भगवान शंकराचा जयघोष असून त्या धर्तीवर अशा प्रकारची एका मानवाची स्तुती करणारी घोषणा दिल्यामुळे भगवान शंकराचा अपमान होत असल्याचे शंकराचार्यानी म्हटले आहे. अशा प्रकारे एखाद्या विशिष्ट मानवाची पूजा करणे हिंदू धर्माच्या विरुद्ध असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनीही या घोषणेला विरोध केला आहे. या घोषणेची निवडणूक आयोगाने दखल घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. आम्ही लोकशाहीचा आदर करतो. पण देवाचे स्थान त्याही पेक्षा वरचे आहे, असे खुर्शीद म्हणाले. भाजपचे सर्व नेते देशाची परंपरा विसरले आहेत. या परंपरेत देवापेक्षा कोणीही मोठे नाही, याचे भान त्यांना उरलेले नाही, असे त्यांनी सांगितले.