फ्रान्सने इसिस विरोधातील कारवाईची धार अधिक तीव्र केली असून, २४ तासात दुस-यांदा फ्रान्सच्या लढाऊ विमानांनी इसिसचे सिरीयातील प्रमुख केंद्र बनलेल्या रक्का शहरावर बॉम्बफेक केली.
पॅरिस- उत्तर सीरियातील रक्का भागात फ्रान्सने हवाई हल्ले करत ‘इसिस’विरोधात धकड मोहीम सुरूच ठेवली आहे. सोमवारी मध्यरात्री फ्रान्सने चढवलेल्या हवाई हल्ल्यात ‘इसिस’चे सीरियातील कमांड सेंटर आणि प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त केल्याची माहिती फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.
२४ तासांत फ्रान्स लष्कराने सलग दुस-यांदा हे हल्ले चढवले आहेत. त्याशिवाय सीरियातील दायेश आणि रक्का येथील दहशतवाद्यांच्या अड्डय़ांवर छापे टाकण्यात आले आहेत.
संरक्षण मंत्रालयाच्या पॅरिस हल्ल्यात आणखी एका दहशतवादी गटाचे नाव पुढे आले आहे. पॅरिसमध्ये शुक्रवारी घडलेल्या रक्तपातानंतर कोणतीही दयामाया न दाखवता ही कारवाई केल्याचे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सिस होलंद यांनी म्हटले आहे.या हवाई हल्ल्यात इसिसचे महत्त्वाचे अड्डे उद्ध्वस्त झाल्याचा दावा फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. दहशतवाद्यांविरोधात मोहिमेसाठी अमेरिकन लष्कराची मदत घेण्यात आली. फ्रान्सकडून सीरियात सप्टेंबरपासूनच कारवाई सुरू होती. मात्र शुक्रवारी पॅरिसवरील हल्ल्यानंतर ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली.
रविवारी रात्री फ्रान्सच्या लष्कराने २० ठिकाणी बॉम्ब हल्ले चढवून रक्का येथे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि फ्रान्सने आपली गुप्तचर यंत्रणा अधिक सक्रिय केली आहे.