सोमवारी सलग तिस-या दिवशीही विरोधकांनी गोंधळ घातल्याने संसदेचे काम ठप्प पडले आहे.
नवी दिल्ली– एफडीआय आणि घरगुती गँस सबसिडीचा मुद्दा विरोधकांनी तिस-या दिवशीही लावून धरला. सकाळी अकरा वाजता कामकाज सुरु झाल्यानंतर लोकसभेत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. मात्र त्यानंतरही गोंधळ कायम राहिल्याने संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे काम मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आले.
हिवाळी अधिवेशनाचे सुरुवातीच्या दोन दिवसातही काहीही काम होऊ शकले नाही. सोमवारी कामकाज सुरु होताच मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्यानंतर लगेच लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात केली. मात्र भाजपच्या नेत्यांनी एफडीआय मागे घ्या अशा जोरदार घोषणा दिल्या. डावे पक्ष, बीजू दल, जनता दल आणि तेलगूदसमच्या नेत्यांनीही भाजपच्या मागणीला समर्थन देत घोषणा दिल्या. दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी घरगुती गँसवरील सबसिडी २४ करावी अशा आशयाचे बँनर्स आणले होते.
दुसरीकडे युपीएच्या घटक पक्षातील द्रमुकचे सदस्यही एका वृत्तपत्रात छापलेल्या टू जी स्पेक्ट्रम प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे घेऊन अध्यक्षांच्या खुर्चीजवळ आले आणि त्यांनीही घोषणाबाजी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर जाऊन बसण्याची विनंती केली.मात्र गोंधळ कायम राहिल्याने लोकसभा १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली.
सोमवारी सलग तिस-या दिवशीही संसदेचे काम ठप्प पडले आहे. भाजप,तृणमूल आणि डावे पक्ष एफडीआयच्या मुद्दयावर सरकारला कोंडीत पकडण्याच्या प्रयत्नांत आहेत. सरकारने या मुद्दयावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत आता काय तोडगा निघतो हेच पहावे लागेल.
[EPSB]
संसदेत दुस-या दिवशीही गोंधळ
हिवाळी अधिवेशनाच्या दुस-या दिवशीही गदारोळ कायम असल्याने संसदेची दोन्ही सभागृहं सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहेत.
[/EPSB]