हरियाणात जिंद जिल्ह्यातील बुधा खेरा रेल्वे स्थानक आंदोलनकर्त्यांनी जाळून टाकण्यात आले असून हरियानातील काही जिल्ह्यात लष्काराला पाचारण करण्यात आले आहे.
चंदिगड- हरियाणात जाट आरक्षणाच्या आंदोलनामुळे सुरु असलेल्या हिंसक घटना शनिवारी दुस-यादिवशीही सुरू आहेत. जिंद जिल्ह्यातील बुधा खेरा रेल्वे स्थानक आंदोलनकर्त्यांनी जाळून टाकले आहे. हरियानातील काही जिल्ह्यात लष्काराला पाचारण करण्यात आले आहे.
फोटो पहाण्यासाठी येथे क्लिक करा
रोहतक, जिंद, झझ्झर, भिवानी, हिस्सार, कैथल, पानिपत, सोनिपत आणि कर्नाल या नऊ जिल्ह्यांत लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. शिवाय केंद्रीय निमलष्करी दलांच्या वीस कंपन्यांची मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे, अशी माहिती हरियाणाच्या पोलीस महासंचालकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदमध्ये दिली.
पोलिसांच्या गोळीबारात एक जण ठार व २५ जण जखमी झाले. दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रोहतक आणि भिवानीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
शुक्रवारी संतप्त जमावाने राज्याचे अर्थमंत्री अभिमन्यू यांचे घर पेटवून दिले. रोहतक, झझ्झर आणि हन्सी येथे जमावाने काही पोलिसांना बंदिवान केले. सरकारी व खासगी मालमत्तेची आणि वाहनांची तोडफोड करून नासधूस केली. सरकारी कार्यालयांच्या इमारती तसेच हिस्सार जिल्ह्यातील हन्सी आणि रोहतकमधील दोन टोल नाकेही आंदोलकांनी उद्ध्वस्त केले.
जाट समाजाचे आरक्षणासाठी गेले काही दिवस हे आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी घेतलेल्या बैठकीत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले.