हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने काश्मीरमधील फुटीरतावादी हुर्रियत संघटनेच्या नेत्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
नवी दिल्ली- हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने काश्मीरमधील फुटीरतावादी हुर्रियत संघटनेच्या नेत्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. काश्मीरमध्ये ‘इस्लामचा लढा’ सुरू आहे. त्याला राजकीय संघर्षा’चे वळण देऊ नका अन्यथा तुम्हाला ठार मारू’, अशी धमकी हिजबुलने हुर्रियतला दिली आहे.
लष्कराने ठार मारलेला दहशतवादी बुरहान वानी याची जागा घेतलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या झाकीर भट्टने एका व्हिडिओतून हुर्रियतच्या नेत्यांना धमकी दिली आहे.
‘आमच्यासाठी तुम्ही मोठी अडचण बनला आहात. तुम्हाला घाणेरडे राजकारण करायचे असेल, तर तुमच्या घरात बसून करा. पण शरीयतची अंमलबजावणी करायची असेल, तर त्याची सुरुवात आपल्यापासूनच केली पाहिजे.
राजकीय नेते हे आमचे नेते होऊ शकत नाही. आमचा इस्लामचा लढा आहे आणि आम्ही काश्मीरमध्ये शरीयत लागू करणारच’, अशा भाषेत दहशतवादी झाकीर भट्टने सय्यद अली शाह गिलानी, मिरवाईज उमर फारूक आणि यासिन मलिक या र्हुयतच्या नेत्यांना व्हिडिओतून धमकावले आहे.
हुर्रियतच्या फुटीरतावादी नेत्यांना झाकिरने दिलेली जीवे मारण्याची धमकी याबाबत हिजबुल मुजाहिदीनचा प्रवक्ता सलिम हश्मी याने खुलासा केला असून झाकिरचे ते वैयक्तिक मत असल्याचे श्रीनगर स्थीत काश्मीर न्यूज सर्व्हिसला ई-मेलद्वारे कळविले आहे. ‘अशा प्रकारचे कोणतेही विधान आमच्यासाठी स्वीकारार्ह नाही. ते झाकिरचे वैयक्तिक मत आहे.
बुरहान वानी याच्या हौतात्म्यानंतर राष्ट्र आणि नेतृत्व प्रत्येक आघाडीवर एकसंध आहे. स्वातंत्र्य आणि इस्लामचा लढा यापुढेही असाच सुरू राहील,’ असे हश्मी याने या मेलमध्ये म्हटले आहे.
काश्मीरचा २७ वर्षाचा सशस्त्र लढा हा इस्लामचा आहे. हा राजकीय संघर्ष नाही. दहशतवादी संघटना आणि जम्मू-काश्मीरमध्ये कुठल्याही प्रकारे तुमची मध्यस्थी खपवून घेणार नाही. तुम्ही काश्मीर हा राजकीय संघर्ष मानत असाल तर कुठलीही इस्लामिक घोषणा आणि चिन्हाचा वापर करू नका, हा आमचा इशारा आहे. अन्यथा काफिरांच्या आधी तुमची मुंडकी आम्ही श्रीनगरच्या लाल चौकात छाटू.
– झाकीर भट्ट, म्होरक्या, हिजबुल मुजाहिदीन झाकिरचे ते वैयक्तिक मत