भारतीय जवानांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ एका निवृत्त जवानाच्या पत्नीने पंतप्रधान मोदींना ५६ इंचांचा ब्लाऊज भेट म्हणून पाठवला आहे.
नवी दिल्ली- भारतीय जवानांवर वारंवार होत असलेल्या हल्ल्यांच्या निषेधार्थ एका निवृत्त जवानाच्या पत्नीने पंतप्रधान मोदींना ५६ इंचांचा ब्लाऊज भेट म्हणून पाठवला आहे. पंतप्रधान मोदी यांनी लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान ५६ इंचाच्या छातीचा उल्लेख केला होता. त्यामुळेच निवृत्त जवानाच्या पत्नीने पंतप्रधान मोदींना ५६ इंचाचा ब्लाऊज पाठवला आहे.
निवृत्त जवान धरमवीर सिंह यांच्या पत्नी सुमन सिंह यांनी पंतप्रधान मोदी यांना २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन दिली आहे. यासाठी सुमन सिंह यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे.
भाजपा सत्तेत आल्यास पाकिस्तान भारतीय जवानांवर हल्ला करण्याची हिंमत करणार नाही, असे २०१४ मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते. मात्र सद्यस्थिती अत्यंत वाईट आहे, असे सुमन सिंह यांनी पत्रात म्हटले आहे.
निवृत्त जवान धरमवीर सिंह यांनी पंतप्रधान मोदी यांना लिहिलेल्या पत्राची आणि त्यासोबत पाठवण्यात आलेल्या ब्लाऊजची माहिती पत्रकारांना दिली. डिसेंबर १९९१ ते २००७ या काळात लष्करात सेवा बजावल्याचे धरमवीर यांनी सांगितले. एका निवृत्त जवानाची पत्नी म्हणून सुमन यांनी त्यांच्या भावना पंतप्रधान मोदींपर्यंत पोहोचवल्याची माहिती धरमवीर सिंग यांनी दिली.