आंतरजातीय विवाह केल्याने गर्भवती मुलीची हत्या करणा-या बापास फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
नाशिक- आंतरजातीय विवाह केल्याने गर्भवती मुलीची हत्या करणा-या बापास फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी ही शिक्षा सुनावली आहे. ऑनर किलिंग प्रकरणात नाशिक न्यायालयाने प्रथमच फाशीची शिक्षा सुनावली आहे.
एकनाथ किसन कुंभारकर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. प्रमिला उर्फ निशा दीपक कांबळे हीची हत्या २८ जून २०१३ मध्ये करण्यात आली होती.
आपल्या मुलीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे समाजात बदनामी होत असल्याच्या रागातून एकनाथ कुंभारकर या बापाने रिक्षामध्ये दोरीच्या सह्ययाने गर्भवती असलेल्या प्रमिलाची गळा दाबून हत्या केली होती. हा सर्वप्रकार रिक्षा चालकाने बघितला असून या एकमेव साक्षीदाराची साक्ष महत्त्वाची ठरल्याने या बापाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
प्रमिला कुंभारकर (१८) हिने बुलडाण्यातील दीपक कांबळे याच्याशी प्रेमविवाह केला होता. या विवाहास कुंभारकरचा विरोध होता. मुलीने आंतरजातीय लग्न केल्याने कुंभारकर संतप्त झाले होते. त्यातच प्रमिला गर्भवती असल्याचे समजताच त्याच्या रागाचा पार चढला. समाजात आपली बदनामी होत असल्याने हा विषय कायमचा संपवायचा एकनाथने ठरवले. २८ जून २०१३ रोजी त्याच्या घराजवळ राहणारा प्रमोद आहेर या रिक्षाचालकास सोबत घेऊन एकनाथ प्रमिलाच्या घरी पोहोचला.
प्रमिलाची आई आजारी असल्याचे सांगत तिला बोलावून घेतले. गंगापूर रोडवरील सावरकर रुग्णालयाजवळ पोहोचले असता प्रमिलाच्या मामाला रुग्णालयातून बोलवून आणा, असे रिक्षाचालक प्रमोद अहिरे यांना सांगितले. आहिरे रुग्णालयात पोहोचताच दोरीच्या सह्ययाने प्रमिलाचा गळा दाबण्यास सुरूवात केली. हा प्रकार सुरू असताना रिक्षाचालक आहिरे परत आले. त्यांनी कुंभारकरला विरोध केला. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही.
पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, तसेच न्यायालयात सादर करण्यात आलेल्या पुराव्याआधारे न्यायालयाने दुर्मिळातील दुर्मीळ घटना असे स्पष्ट करीत आरोपीस फाशीची शिक्षा सुनावल्याची माहिती सरकारी वकील पोर्णिमा नाईक यांनी दिली.