जगाची महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी मंगळवारी मतदान होणार आहे.
वॉशिंग्टन- जगाची महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी मंगळवारी मतदान होणार आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अटीतटीची लढत होणार आहे. अमेरिकेला पहिल्यांदा महिला अध्यक्ष मिळणार का? याकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे.
मतदानाच्या आदल्या दिवशी क्लिंटन व ट्रम्प यांनी प्रचाराची जोरदार राळ उडवून दिली. त्यातच हिलरी क्लिंटन यांना ईमेल प्रकरणी एफबीआयने क्लीनचिट दिल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. क्लिंटन यांच्यावर फौजदारी कारवाई करता येणार नाही, असे एफबीआयने स्पष्ट केले.
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेची ओळख पुसून टाकणाऱ्या शक्तींचा पराभव करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. आम्ही विजयाच्या दिशेने निघालो आहोत. आमचा विजय ऐतिहासिक असेल, असे त्यांनी सांगितले. कोलारॅडो, नेवाडा, नॉर्थ कॅरोलिना, व्हर्जिर्निया, फ्लोरिडा, पेनसिल्व्हिनिया राज्यात आम्हाला विजय मिळेल, असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला.
तर हिलरी क्लिंटन म्हणाल्या की, महिला समानतेच्या दिशेने देशाचे पाऊल पडत आहे. फुटीरता व एकता यांच्यापैकी एकाची निवड करायची आहे. आपली मुले व नातवंडांचे भविष्य सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने मतदान करा. अल्पसंख्याकांना जाणवणारा धोका मतदानाने दूर होऊ शकतो, अशा शब्दांत त्यांनी ट्रम्प यांच्यावर टीका केली.
दरम्यान, या निवडणुकीची भाकिते प्रसारमाध्यम व वेबसाईट वर्तवत आहेत. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने सांगितले की, ट्रम्प यांच्यापेक्षा क्लिंटन या चार टक्क्यांनी पुढे आहेत. या निवडणुकीत क्लिंटन जिंकण्याची शक्यता ६५ टक्के आहे, असे फाईव्हथर्टीऐट वेबसाईटने जाहीर केले.