राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांसमोरील अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
नवी दिल्ली- राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांसमोरील अडचणीत वाढ होताना दिसत आहे. लालू प्रसाद यादव यांच्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल केला असतांना शनिवारी त्यांची कन्या मिसा भारती आणि जावई शैलेश कुमार यांच्या विविध ठिकाणांवर ईडीने छापे मारले आहेत.
रेल्वेमंत्री असताना रांची आणि पुरी येथील हॉटेलच्या निविदावाटपात गैरव्यवहार केल्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात सीबीआयने काल गुन्हा दाखल केला आहे. लालूंसोबतच पत्नी राबडीदेवी आणि त्यांच्या मुलावरही गुन्हा नोंदवण्यात आला तसेच या घोटाळ्याशी संबंधित १२ ठिकाणांवर काल सीबीआयने छापेही टाकले होते.
शनिवारी सकाळी ईडीने राज्यसभा खासदार मिसा भारती आणि त्यांचा पती शैलेश कुमार यांच्या तीन मालमत्तांवर छापे टाकले. यामध्ये दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळाजवळील बिजवासन फार्महाऊसचाही समावेश आहे. त्याचबरोबर सैनिक फार्म आणि घिटोरनीचाही समावेश आहे. मनी लॉड्रिंगच्या या प्रकरणात आठ हजार कोटी रुपये काळ्याचे पांढरे केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.