संस्थेत रिक्त असलेली शिक्षकांची चार पदे तातडीने भरावीत. अन्य रिक्त पदेही भरली जावीत, अशी मागणी कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी कामगार व कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्याकडे केली.
कणकवली- फोंडाघाट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत केवळ सहा ट्रेडच शिकवले जातात. याव्यतिरिक्त वेल्डिंग, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रिशिअन, मोटर मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, फिटर, रेफ्रिजरेशन हे ट्रेडही सुरू व्हावेत, यासाठी संस्थेत रिक्त असलेली शिक्षकांची चार पदे तातडीने भरावीत. अन्य रिक्त पदेही भरली जावीत, अशी मागणी कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी कामगार व कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्याकडे केली.
आमदार नितेश राणे यांनी शुक्रवारी अधिवेशनादरम्यान कामगार व कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी फोंडाघाट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीची झालेली दुरवस्था व प्रशिक्षण संस्थेतील रिक्त पदांची व अन्य ट्रेड सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली. या विषयाचे निवेदनही आमदार नितेश राणे यांनी पाटील यांना दिले.
महाराष्ट्र सरकारने २००० पासून फोंडाघाट येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू केली आहे. या संस्थेत सध्या केवळ सहा ट्रेड शिकवले जात आहेत. तरुणांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले वेल्डिंग, इलेक्ट्रिशिअन, मोटर मेकॅनिकल, डिझेल मेकॅनिकल, फिटर, रेफ्रेजिरेशन हे ट्रेड शिकवले जात नाहीत. जिल्ह्यातील अन्य आयटीआयत मात्र ते शिकवले जातात. त्यामुळे या संस्थेतील विद्यार्थ्यांना या ट्रेडपासून वंचित राहावे लागत आहे.
इंटेरिअर डेकोरेशन अँड डिझायनिंग, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रीक अँड इलेक्ट्रॉनिक, कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेटेंनन्स, फॅशन टेक्नॉलॉजी अँड डिझायनिंग या चार ट्रेडसाठी तासिका तत्त्वार दरमहा ५ हजार ५०० रुपये इतक्या मानधनावर चार शिक्षक नियुक्त आहेत. प्राचार्यासह चार शिक्षकांची पदे गेल्या चार वर्षापासून रिक्त आहेत ती तातडीने भरा, अशी मागणीही राणे यांनी केली.