कडाडणारे ताशे, जोरदार वाजणारे ढोल, रांगोळ्यांच्या पायघडय़ा आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’चा गजर करत लाडक्या गणरायाला पुणेकरांनी निरोप दिला.
पुणे- कडाडणारे ताशे, जोरदार वाजणारे ढोल, रांगोळ्यांच्या पायघडय़ा आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’चा गजर करत लाडक्या गणरायाला पुणेकरांनी निरोप दिला. यंदाची मिरवणूक २८ तास ३०मिनिटे चालली. गतवर्षीपेक्षा २५ मिनिटे लवकर विसर्जन मिरवणूक संपली. तब्बल चार हजार सार्वजनिक मंडळांनी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, असे साकडे घालत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
दुपारी ३ वाजता रास्ता पेठेतील समर्थ मित्र मंडळाच्या गणेशाचे नटेश्वर घाटावर विसर्जन झाले आणि या विसर्जन मिरवणुकीचा समारोप झाला. २०१४ मध्ये २९ तास १२ मिनिटांनी, २०१५ मध्ये २८ तास ५५ मिनिटांनी पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचा समारोप झाला होता.
यंदा गतवर्षीपेक्षा २५ मिनिटे लवकर विसर्जन मिरवणूक संपली. गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता पुण्यातील मिरवणुकीला सुरुवात झाली. महापौर दत्तात्रय धनकवडे, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते श्री कसबा गणपतीची आरती मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ करण्यात आली आणि ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली. ही मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरून टिळक चौकाकडे मार्गस्थ झाली.
उत्साही वातावरणात, ढोल-ताशाच्या गजरात दुपारी चारनंतर मानाच्या गणपतींचे हौदामध्ये विसर्जन करण्यात आले. तसेच श्रीमंत भाऊ रंगारी मंडळ, अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने देखील हौदातच विसर्जन केले. घरच्या गणपतींचे गणेश भक्तांनी कृत्रिम विसर्जन हौदातच मूर्ती विसर्जित करण्याला प्राधान्य दिले.
पोलीस हवालदाराला हुल्लडबाजांकडून मारहाण
पुणे- पोलिसांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढतच आहेत. पोलीस उपनिरीक्षक सुरेश चपटे यांचा दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत जखमी झाल्याने उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच अल्का टॉकीज चौक येथे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत एका पोलीस हवालदारला काही हुल्लडबाजांनी बेदम मारहाण केली.
या मारहाणीत त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर पुना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. विजयकुमार पाटने असे हल्ल्यात जखमी झालेल्या पोलीस कर्मचा-याचे नाव आहे. ते संभाजी पोलीस चौकीत कार्यरत आहेत. या प्रकरणी विनायक जांभुळकर याला पोलिसांनी अटक केली असून अन्य दोघे पसार आहेत.
अल्का टॉकीज चौक येथे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत विजयकुमार पाटने हे कर्तव्यावर होते. पाटने आपले कर्तव्य बजावत असताना मिरवणुकीतील काही हुल्लडबाज तरुणांबरोबर त्यांचा वाद झाला.
गर्दीचा फायदा घेत या हुल्लडबाजांनी पाटने यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांच्या डोळ्याच्या खालच्या बाजूस गंभीर दुखापत झाली. त्यांना पुना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
पुण्यात नगरसेवकावर गोळीबार
गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान लष्कर परिसरातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक विवेक यादव यांच्यावर गुरुवारी रात्री गोळीबार झाला. गोळीबार करणा-या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
बंदुकीची गोळी त्यांच्या गालातून आरपार गेली असून, गालावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. गोळीबार करणा-या विष्णू ऊर्फ बबलू गवळी याला जमावाने बेदम मारहाण केली. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हजारहून अधिक मोबाईलची चोरी
पुणे- पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटयांनी डाव साधला. विसर्जनाच्या दिवशी बेलबाग चौक ते अलका चौक या परिसरात तब्बल एक हजारहून अधिक मोबाईलची चोरी झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत.
गर्दीचा फायदा घेत चोरटयांनी मोबाईल लंपास केले. दरम्यान, फरासखाना पोलिसांनी या प्रकरणी दोन चोरांना अटक केली असून त्यांच्याकडून २० मोबाईल जप्त केले आहेत. तर इतर चोर आणि मोबाईलचा तपास सुरू आहे.