कोकणसह राज्यातील अनेक भागात मान्सूनचे आगमन झालेले असतानाच मुंबईतील अनेक भागात रविवारी जोरदार पावसाला सुरुवात झाली.
मुंबई- कोकणसह राज्यातील अनेक भागात मान्सूनचे आगमन झालेले असतानाच मुंबईतील अनेक भागात रविवारी जोरदार पावसाला सुरुवात झाली. मुंबई, उपनगरात रविवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्याने पावसात भिजून मुंबईकर ‘संडे’ साजरा करत असल्याचे अनेक ठिकाणी पहायला मिळाले.
येत्या २४ तासांत कोकणासह मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने शनिवारी वर्तविला होता. हवामान खात्याचा हा अंदाच खरा ठरला असून रविवारी सकाळपासूनच मुंबईतील अनेक भागात पाऊस पडायला सुरूवात झाली. मुंबई, ठाणे कोकण परिसरात पाऊस बरसल्याने उन्हापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असला तरी रेल्वे वाहतूक सुरळित सुरू आहे. मेगाब्लॉक असल्याने लोकल उशिराने धावत आहेत. अद्यापही मुसळधार पावसाचा कोणताही परिणाम रेल्वे वाहतूकीवर झालेला नाही.
सध्याची पूरक स्थिती पाहत कोकणात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. याशिवाय कर्नाटकाचा अंतर्गत भाग, रायलसीमाचा आणखी काही भाग, आंध्र प्रदेश किनारपट्टी, मध्य आणि उत्तर बंगालचा उपसागर आणि त्रिपुरा, आसाम, मेघालयाचा उर्वरित भागातही पावसाने हजेरी लावली आहे.