मी सुद्धा १०० टक्के हिंदू आहे, पण मी भाजपाप्रमाणे लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम करत नाही, अशा खोचक शब्दात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी भाजपावर टीका केली आहे.
म्हैसूर- संपूर्ण देशात पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्दावरून तणाव निर्माण झाला असून यावर बोलतांना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. दक्षिण कर्नाटकमधील सध्याच्या धार्मिक तणावाच्या संदर्भात ते बोलत होते.
‘मी सुद्धा हिंदू आहे, माझे नावच ‘सिद्ध राम’ आहे. पण मी भाजपासारखे लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम करत नाही. भाजपाचे काही नेते कर्नाटकचे दौरे करत आहेत आणि स्वतःला विस्तारक म्हणवून घेत आहेत. याचा अर्थ काय? बाकी काही नसून हिंदूत्वाच्या मुद्द्याचा विस्तार करत असल्याचे सांगत त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
‘आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये ध्रुवीकरण करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्याचा विस्तार करण्याचे राजकारण आहे,’ असे म्हणत त्यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला.
‘उत्तर प्रदेशात भाजपाला मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती कर्नाटकात करायची असेल पण कर्नाटकात ते होणार नाही, असे यावेळी सिद्दरामय्या यांनी भाजपाला ठणकावले आहे.