जनावरांच्या जागेवर जाऊन उपचार करता यावेत याकरिता राज्य शासनाकडून पशुसंवर्धन विभागाला अत्याधुनिक पशुवैद्यकीय सोयी-सुविधांनी सज्ज असलेल्या ३८९ मोबाईल व्हॅन मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिली.
लातूर- जनावरांच्या जागेवर जाऊन उपचार करता यावेत याकरिता राज्य शासनाकडून पशुसंवर्धन विभागाला अत्याधुनिक पशुवैद्यकीय सोयी-सुविधांनी सज्ज असलेल्या ३८९ मोबाईल व्हॅन मिळणार असल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिली. उदगीर तालुक्यातील मौजे हंडरगुळी येथील पशुबाजाराच्या उद्घाटन प्रसंगी जानकर बोलत होते. यावेळी उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रकाशराव देशमुख, कृषि उत्पन्न बाजार समिती उदगीरचे संचालक कल्याणराव पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या शितलताई कल्याणराव पाटील, पंचायत समिती उदगीरच्या सभापती सत्यकला गंभीरे, जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी श्री.बोधनकर, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय हं.रा.बिराजदार आदि उपस्थित होते.
पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री जानकर म्हणाले की, पशुपालकांच्या आजारी जनावरांच्या उपचारासाठी एका कॉलवर पशुवैद्यकीय सुविधांनी सज्ज असलेली व्हॅन पशुपालकांच्या घरी जाऊन आजारी जनावरांवर उपचार करणार आहे. त्यामुळे पशुपालकांना पशुवैद्यकीय दवाखान्यात आपल्या पशुंना घेऊन न जाता जागेवरच उपचार मिळणार असल्याचे त्यांचा वेळ व त्रास वाचणार आहे, असे त्यांनी सांगितले. पशुवैद्यकीय सुविधांनी सज्ज असलेली मोबाईल व्हॅनची किंमत २४ लाख रुपये इतकी असून तेलंगणा राज्यातील मोबाईल व्हॅनपेक्षाही अधिक दजेर्दार सुविधा ह्या व्हॅनमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत, असे जानकर यांनी सांगितले.
तसेच राष्ट्रीय दुग्धविकास बोर्डच्या प्रकल्पांतर्गत लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, लातूर, चाकूर, रेणापूर व औसा या पाच तालुक्यांचा समावेश झालेला असून या प्रकल्पांतर्गत उपरोक्त पाच तालुक्यातील ३४९ गावांची निवड होऊन या गावामध्ये दुग्ध उत्पादनाला चालना देणे, मदर डेअरी प्रकल्प राबविणे तसेच शेतक-यांच्या दुधाला चांगला भाव मिळवून देणे आदि बाबींचा समावेश असल्याची माहिती जानकर यांनी दिली. हंडरगुळी येथील बैल बाजारासाठी वाढीव जमीन उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन सदरची जागा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच हंडरगुळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे मजबुतीकरण व बळकटीकरण करण्याबरोबरच येथील सर्व मंजूर पदे त्वरीत भरली जातील, असे जानकर यांनी स्पष्ट केले.
सोमनाथपूर येथील गोशाळेला भेट देऊन गोरक्षण व संगोपनाच्या कामांची प्रशंसा जानकर यांनी केली. देवणी येथील गोवंश जातीचे जतन व संवर्धन करण्यासाठी ४०० कोटीची तरतूद करण्यात येणार असून देवणी येथे लवकरच गोवंश संशोधन केंद्र सुरु करण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली.
कृषि विकासाच्या दरापेक्षा पशुसंवर्धनाचा दर अधिक चांगला आहे. या विभागाला चांगला निधी उपलब्ध झाल्यास राज्यातील एक ही शेतकरी आत्महत्यास प्रवृत्त होणार नाही, असा विश्वास श्री.जानकर यांनी व्यक्त केला. नळेगाव येथील मत्स्यबीज केंद्राची पाहणी जानकर यांनी करुन या माध्यमातून अधिक प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याची सूचना केली. जिल्ह्यातील ३० पशुवैद्यकीय दवाखान्यांना आयएसओ प्रमाणपत्र मिळवून देणे तसेच पशुसंवर्धन व दुग्धविकासाच्या योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांंपयर्ंत पोहोचविण्याचे काम जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री.बोधनकर चांगल्या पद्धतीने करत असल्याबाबत जानकर यांनी त्यांची प्रसंशा केली.
[EPSB]
[/EPSB]