कोकण म्हणजे जाखडीनृत्याचे जन्मस्थान. याच कोकणात अनेक शाहिरांनी जाखडी नृत्यकला जोपासली. आता जाखडीनृत्याने पारंपरिक रूप पालटून आधुनिक साज चढविला आहे.
शृंगारतळी- कोकण म्हणजे जाखडीनृत्याचे जन्मस्थान. याच कोकणात अनेक शाहिरांनी जाखडी नृत्यकला जोपासली. आता जाखडीनृत्याने पारंपरिक रूप पालटून आधुनिक साज चढविला आहे. मात्र, याच जाखडीनृत्याला गुहागर तालुक्यातील वरवेली गावचे प्रतिष्ठित नागरिक अरुण नारायण विचारे यांनी राजाश्रय दिला आहे. दरवर्षी अनेक कलाकारांना आमंत्रित करून त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचे काम श्री. विचारे करीत आहेत.
पूर्वी अनेक कला व कलाकारांना राजाश्रय मिळत असल्याने पारंपरिक कला टिकून राहिल्या आहेत. मात्र, त्यानंतरच्या काळात पारंपरिक कला व कलाकारांचा राजाश्रय संपुष्टात आला. मात्र, कोकणातील या पारंपरिक कलांचा व कलाकारांचा सन्मान राखण्याचे व त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य गुहागर तालुक्यातील वरवेली गावचे सुपुत्र व ज्येष्ठ कलाप्रेमी अरुण विचारे कित्येक वर्षापासून करीत आहेत. ग्रामीण कलाकारांना नवनवीन आव्हाने पेलण्यासाठी ते संधी व प्रोत्साहन देत आहेत.
याही वर्षी त्यांच्या निवासस्थानी संपूर्ण गावाच्या मनोरंजनासाठी शक्ती-तुरा या पारंपरिक कलेचे सादरीकरण करण्यात आले होते. या नृत्य पथकात लांजा तालुक्यातील कुवे गावचे सुपुत्र शाहीर नेमन बुवा व तुरेवाले शाहीर कोंडय़े गावचे सुपुत्र शाहीर देवेंद्र झिमण यांच्या जाखडी नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पारंपरिक कलांची जोपासना करता-करता कला टिकली पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील आहेत. दरवर्षी गणेशोत्सवात ते अनेक कलाकारांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करतात.
त्यांचा हा उपक्रम कोकणातील जाखडी नृत्याला संजीवनी देणारा ठरत आहे. त्यामुळे कोकणातील अनेक कलाकार व त्यांची कलापथके यांना ‘राजाश्रय’ मिळत आहे. आज या पारंपरिक कलांचे आधुनिकीकरण झाले असले तरी प्रतिसाद देणारे रसिक दुरावत आहेत. हे टाळण्यासाठी श्री. विचारे ग्रामीण भागात विविध कार्यक्रम ठेवून पारंपरिक कला जतन करण्याचे कार्य गेली अनेक वष्रे करीत आहेत.
[EPSB]
मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाला सुरूवात
[/EPSB]