शास्त्रीय गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचे मुंबईत निधन झाले.
मुंबई- शास्त्रीय गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचे मुंबईत निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. सोमवारी रात्री त्यांनी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी सायंकाळी चार वाजता दादरमधील शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
जयपूर घराण्याच्या विख्यात गायिका आणि त्यांच्या आई मोगूबाई कुर्डीकर यांच्यामुळे घरातच त्यांना गायनकलेचा समृद्ध वारसा मिळाला होता. वडील माधवदास भाटिया यांनीही त्यांना प्रोत्साहन दिले. ख्याल गायकीबरोबरच ठुमरी, भजन गायनात त्यांनी आपल्या शैलीची मुद्रा उमटवली.
१० एप्रिल १९३२ रोजी मुंबईतच जन्मलेल्या किशोरीताईंना नंतर भेंडीबझार घराण्याच्या अंजलीबाई मालपेकर यांचे मार्गदर्शन लाभले. शास्त्रीय संगीताची गोडी असलेल्या किशोरीताई हिंदी चित्रपट संगीताकडे वळल्या. १९५० च्या दरम्यान दोन वर्षे काही कारणास्तव त्यांचा आवाज गेला होता. त्यानंतर त्यांना चित्रपटसृष्टीत कटू अनुभव आले. त्यांनी पुन्हा शास्त्रीय संगीताला वाहून घेतले.
किशोरीताई यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल १९८७ मध्ये पद्मभूषण व २००२ मध्ये पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. २०१३ मध्ये राज्य शासनाच्या पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
माणिक भिडे, नंदिनी बेडेकर, आरती अंकलीकर-टिकेकर, देवकी पंडित आणि रघुनंदन पणशीकर हे त्यातील काही महत्त्वाची शिष्यगण. नात तेजश्री हिच्या विवाह समारंभात गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचे अखेरचे दर्शन घडले होते. तेजश्री ही त्यांच्या गायिकाचा वारसा जपत आहे.