नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदानासाठी पैसे घेण्यास मतदारांना प्रोत्साहित करणारे वक्तव्य करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे चांगलेच अडचणीत आले आहेत.
नांदेड- नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदानासाठी पैसे घेण्यास मतदारांना प्रोत्साहित करणारे वक्तव्य करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे चांगलेच अडचणीत आले आहेत.
या प्रकरणी बुधवारी रात्री उशिराने दानवेंविरोधात पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पैठण येथे दि. १७ रोजी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात दानवे यांनी मतदारांना उद्देशून ‘दारी आलेल्या लक्ष्मीला नाकारू नका’, असे वक्तव्य केले होते. या सभेला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेही उपस्थित होत्या.
दानवेंच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीनही पक्षांनी दानवेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
त्यानंतर दानवेंकडे आयोगाने स्पष्टीकरणही मागवले होते. दानवे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणाने आयोगाचे समाधान झाले नाही. त्यामुळे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी औरंगाबादच्या जिल्हाधिकारी निधी पांडे यांना दानवेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार बुधवारी मध्यरात्री रावसाहेब दानवेंविरुद्ध भादंविच्या कलम १७१ व महापालिका, नगरपंचायत, नगरपालिका अधिनियम १९६८च्या कलम २२ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी ही माहिती दिली. रावसाहेब दानवेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तीन प्रमुख पक्षांनी केलेली मागणी पूर्ण झाली असली तरी या गुन्ह्याच्या तपासात पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.