मार्टिन गप्टिलची तुफान फलंदाजी आणि त्यानंतर बोल्टने केलेला भेदक मारा यांच्या जोरावर न्यूझीलंडने वेस्ट इंडिजवर १४३ धावांनी विजय मिळवत विश्वचषकातील उपांत्यफेरीत आगेकूच केली.
वेलिंग्टन – सहयजमान न्यूझीलंडने अपेक्षेप्रमाणे उपांत्य फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीच्या चौथ्या लढतीत शनिवारी त्यांनी वेस्ट इंडिजवर १४३ धावांनी मोठा विजय मिळवला. सलामीवीर मार्टिन गप्टिलचे (नाबाद २३७) द्विशतक न्यूझीलंडच्या मोठय़ा विजयाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले.
सातव्यांदा उपांत्य फेरी गाठणा-या सहयजमानांसमोर उपांत्य फेरीत मंगळवारी (२४ मार्च) ऑकलंडवर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल.
गप्टिलची फटकेबाजी तसेच न्यूझीलंडचे मोठे (६ बाद ३९३ धावा) मोठे आव्हान पाहता सामना एकतर्फी होणार, हे नक्की झाले. तसे घडलेही. एकटय़ा ख्रिस गेलवर अवलंबून असलेल्या वेस्ट इंडिजने २५० धावा केल्या तरी केवळ ३०.३ षटकेच त्यांना खेळून काढता आली. वेस्ट इंडिजचा १४३ धावांनी झालेला पराभव विश्वचषकाच्या बाद फेरीतील धावांच्या फरकाने झालेला सर्वाधिक मोठा पराभव आहे.
न्यूझीलंडच्या बहारदार फलंदाजीनंतर सामन्याचा निकाल स्पष्ट झाला. त्यामुळे केवळ औपचारिकता उरली. वेस्ट इंडिजने अडीचशे धावांचा टप्पा गाठला तो ख्रिस गेलमुळेच. त्याने ३३ चेंडूंत २ चौकार आणि २ चौकारांसह ६१ धावा फटकावल्या. गेलनंतर कर्णधार जेसन होल्डर (४२) आणि जोनाथन कार्टरने (३२) थोडा प्रतिकार केला.
मात्र ठराविक अंतराने पडलेल्या विकेट तसेच डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचा (४४-४) अचूक मारा न्यूझीलंडला मोठय़ा विजयासाठी फार प्रतीक्षा करावी लागली नाही. बोल्टने चार विकेटसह सर्वाधिक विकेट घेणा-या गोलंदाजांमध्ये पहिले स्थान पटकावले. त्याच्या खात्यात १९ विकेट आहेत. बोल्टला सहकारी टिम साउदी आणि ऑफस्पिनर डॅनियल व्हेटोरीची (प्रत्येकी २ विकेट) चांगली साथ लाभली.
न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अधिक लवकर मिळवून दिला तरी शनिवारचा ‘हीरो’ सलामीवीर मार्टिन गप्टिल ठरला. त्याने चौफेर फटकेबाजी करताना वेस्ट इंडिजच्या सर्वच गोलंदाजांना निष्प्रभ केले. सुरुवातीला जीवदान मिळाले तरी शतक ठोकल्यानंतरचा रुद्रावतार पाहता कधी एकदा डावाची षटके संपतात, असे प्रतिस्पर्धी गोलंदाजांना झाले.
गप्टिलने यंदाच्या विश्वचषकातील सलग दुस-या आणि वनडेतील सातव्या शतकासाठी १११ चेंडू घेतले. मात्र पुढील १३७ धावा फटकावण्यासाठी त्याला केवळ ५२ चेंडू पुरेसे ठरले. गप्टिलने २४ चौकार आणि ११ षटकारांसह केवळ १३६ चेंडूंत नाबाद २३७ धावा फटकावल्या.
गप्टिलच्या आक्रमक खेळीमुळे न्यूझीलंडने चारशेच्या घरात कधी झेप घेतली, हेच कळले नाही. पहिल्या १०० धावा होण्यासाठी १९ षटके लागली. द्विशतक ३६व्या षटकांत लागले. मात्र उर्वरित १४ षटकांत १९३ धावा निघाल्या. यावरून गप्टिलच्या नेत्रदीपक खेळीचा अंदाज येतो. गप्टिलने रॉस टेलरसह तिस-या विकेटसाठी केलेली १४३ धावांची भागीदारी न्यूझीलंडच्या डावातील सर्वाधिक भागीदारी ठरली.
गप्टिलने आंद्रे रसेल आणि जेसन होल्डरलची सर्वाधिक धुलाई केली. दोघांनीही प्रत्येकी ६ षटकार लगावले. रसेलला १० षटकांत ९६ धावा मोजाव्या लागल्या. होल्डरने ८ षटकांत ७६, सुलीमन बेनने १० षटकांत ६६ तसेच जेरॉम टेलरने ७ षटकांत ७१ धावा दिल्या. केवळ डॅरेन सॅमी (८-०-३८-०) गप्टिलच्या तडाख्यातून वाचला.
तब्बल ३१ षटकारांची आतषबाजी
न्यूझीलंड वि. वेस्ट इंडिज लढतीत षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. एकूण ३१ षटकारांची नोंद झाली. मार्टिन गप्टिलने ११ षटकार ठोकत नवा विक्रम रचला तरी न्यूझीलंडतर्फे १५ षटकार मारले गेले. हरूनही वेस्ट इंडिजतर्फे १६ षटकार लगावले गेले. त्यात गेलच्या आठ षटकारांचा समावेश आहे. सर्वाधिक षटकार ठोकण्यात गेलने (२६ षटकार) बाजी मारली आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डेविलियर्स (२० षटकार) दुस-या स्थानी आहे.
गप्टिललाही रोहितप्रमाणे (४ धावांवर) जीवदान मिळाले
गप्टिलने (नाबाद २३७) विश्वचषकात विक्रमी खेळी केली. मात्र वनडेतील रोहित शर्माचा (नाबाद २६४) विक्रम त्याला मागे टाकता आला नाही. विक्रमी खेळी केली तरी दोघेही सुदैवी ठरले. गप्टिलला चार धावांवर जेरॉम टेलरच्या गोलंदाजीवर डावातील तिस-या चेंडूवर मार्लन सॅम्युअल्सने जीवदान दिले. हे जीवदान विंडिजला चांगलेच महागात पडले. योगायोग म्हणजे रोहितच्या विक्रमी खेळीतही (वि. श्रीलंका, कोलकात,ा २०१४) नशीबाचा मोठा वाटा आहे. त्यालाही चार धावांवर जीवदान मिळाले होते.
स्कोअर बोर्ड
न्यूझीलंड – मार्टिन गप्टिल नाबाद २३७, ब्रेंडन मॅककलम झे. होल्डर गो. टेलर १२, केन विल्यमसन झे. गेल गो. रसेल ३३, रॉस टेलर धावचीत (रामदिन/बेन) ४२, कोरी अॅँडरसन झे. गेल गो. रसेल १५, ग्रॅँट इलियट पायचीत गो. टेलर २७, ल्युक रॉँकी झे. बेन गो. टेलर ९, डॅनियल व्हेटोरी नाबाद ८, अवांतर – १० धावा (लेगबाईज २, वाईड ७, नोबॉल १), एकूण – ५० षटकांत ६ बाद ३९३
बादक्रम : १-२७ (मॅककलम), २-८९ (विल्यमसन), ३-२३२ (टेलर), ४-२७८ (अॅँडरसन), ५-३३३ (इलियट), ६-३६५ (रॉँकी)
गोलंदाजी : जेरोमी टेलर ७-०-७१-३, जेसन होल्डर ८-०-७६-०, सुलिमन बेन १०-१-६६-०, आंद्रे रसेल १०-०-९६-२, डॅरेन सॅमी ८-०-३८-०, मार्लन सॅम्युअल्स ७-०-४४-०.
वेस्ट इंडिज – ष्टिद्धr(164)ास गेल त्रि. गो. मिल्ने ६१, जॉन्सन चार्ल्स त्रि. गो. बोल्ट ३, लेंडल सिमॉन्स झे. गप्टिल गो. बोल्ट १२, मार्लन सॅम्युअल्स झे. व्हेटोरी गो. बोल्ट २७, दिनेश रामदिन पायचीत गो. बोल्ट ०, जोनाथन कार्टर त्रि. गो. व्हेटोरी ३२, डॅरेन सॅमी झे. रॉँकी गो. अॅँडरसन २७, आंद्रे रसेल त्रि. गो. साउदी २०, जेसन होल्डर झे. अॅँडरसन गो. व्हेटोरी ४२, जेरोमी टेलर झे. गप्टिल गो. साउदी ११, सुलिमन बेन नाबाद ९, अवांतर – ६ (वाईड ६), एकूण – ३०.३ षटकांत सर्वबाद २५० धावा.
बादक्रम : १-४ (चार्ल्स), २-२७ (सिमॉन्स), ३-८० (सॅम्युअल्स), ४-८० (रामदिन), ५-१२० (गेल), ६-१६६ (सॅमी), ७-१७३ (कार्टर), ८-२०१ (रसेल), ९-२२१ (टेलर), १०-२५० (होल्डर)
गोलंदाजी : टिम साउदी ८-१-८२-२, ट्रेंट बोल्ट १०-३-४४-४, डॅनियल व्हेटोरी ६.३-०-५८-२, अॅडम मिल्ने ४-०-४२-१, कोरी अॅँडरसन २-०-२४-१
निकाल : न्यूझीलंड १४३ धावांनी विजयी. सामनावीर : मार्टिन गप्टिल.
सामनावीर – मार्टिन गप्टिल