यजमान ब्राझील आणि जर्मनीपाठोपाठ लिओनेल मेसीच्या नेतृत्वाखालील अर्जेटिनाने फिफा वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
ब्रासिलिया– यजमान ब्राझील आणि जर्मनीपाठोपाठ लिओनेल मेसीच्या नेतृत्वाखालील अर्जेटिनाने फिफा वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीच्या तिस-या लढतीत शनिवारी त्यांनी बेल्जियमला १-० असे हरवले. आठव्या मिनिटाला गोन्झॉलो हिग्युएनने केलेला एकमेव गोल निर्णायक ठरला. तब्बल २४ वर्षानी आणि चार वर्ल्डकपनंतर अर्जेटिनाने उपांत्य फेरी गाठली.
जर्मनीप्रमाणे अर्जेटिनानेही समान फरकाने उपांत्यपूर्व लढत जिंकताना अंतिम चार संघांत धडक मारली. दोन्ही संघांनी सुरुवातीला घेतलेली आघाडी आगेकूच करण्यात महत्त्वपूर्ण ठरली. बेल्जियमविरुद्ध ‘स्टार’ लिओनेल मेसीचा तितका प्रभाव दिसला नाही. यापूर्वी, १९९० मध्ये अर्जेटिनाने अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
गोन्झॉलो हिग्युएनने सामन्यातील आठव्यात मिनिटाला केलेल्या निर्णायक गोलमुळे अर्जेंटिनाला उपांत्य फेरीत प्रवेश करु शकला . यजमान ब्राझील आणि माजी विजेता जर्मनीने उपांत्य फेरी गाठल्यानंतर अर्जेंटिनाच्या रुपाने आणखी एक माजी विजेता आणखी २०व्या फिफा विश्वचषकाच्या दावेदारीसाठी सज्ज झाला आहे.
‘फ्लॉप’ हॅझार्ड
बेल्जियमचे वर्ल्डकपमधील आव्हान संपले असले तरी २००६ आणि २०१० वर्ल्डकपसाठी पात्र ठरण्यात अपयश आल्यानंतर त्यांनी येथे चांगली मजल गाठली. मात्र त्यांचा ‘प्लेमेकर’ चेल्सी क्लबचा स्टार इडेन हॅझार्डला सातत्याने येत असलेले अपयश अर्जेटिनाविरुद्धच्या पराभवास कारणीभूत ठरले. या वर्ल्डकपमध्ये एकही गोल हॅझार्ड करू शकला नाही. त्याने बेल्जियमच्या इथपर्यंतच्या प्रवासात काही महत्त्वपूर्ण पासेस दिले असले तरी अर्जेटिनाविरुद्ध तो निष्क्रिय वाटत होता. अखेर ७५व्या मिनिटाला हॅझार्डच्या जागी बदली पाठवण्यात आला. मात्र तोवर फार उशीर झाला होता.
आठवणींना उजाळा
शनिवारच्या विजयामुळे अर्जेटिनाने १९८६ वर्ल्डकपच्या आठवणी ताज्या केल्या. त्यावेळी त्यांनी उपांत्य फेरीत बेल्जियमला नमवल्यावर वर्ल्डकप जेतेपद पटकावले होते.
उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमविरुद्ध पहिले सत्र अर्जेंटिनाच्या नावे राहिले. आठव्या मिनिटाला गोन्झॉलो हिग्युएनने मिळवून दिलेली आघाडी त्यांना मध्यंतरापर्यंत कायम राखली.
या सत्राचा विचार करताना ५४ टक्के चेंडूचा राखण्यात अर्जेंटिनाला यश आले. त्यांनी गोल करण्यासाठी केलेले प्रयत्नही (टार्गेट) बेल्जियमपेक्षा अधिक आहेत.
पहिल्या सत्रात दोन्ही संघांना पेनल्टी कॉर्नर मिळवता आला नाही. अर्जेंटिनाचा मागील लढतीचा ‘मॅचविनर’ अँजेल डी मारियाने ३३व्या मिनिटाला मैदानाबाहेर जाणे पसंत केले. त्याच्या जागी पेरेझ आला. दुखापतीमुळे मारियाला लवकर पॅव्हेलियन पाठवण्यात आले. दुस-या सत्रात बेल्जियमने तीन खेळाडू बदली केले मात्र त्यांना अर्जेंटिनाचा गोळ जाळ्यात चेंडू पाठवता आला नाही.