कांदिवलीमध्ये एका दुमजली इमारतीला भीषण आग लागली असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
मुंबई- कांदिवलीमध्ये एका दुमजली इमारतीला भीषण आग लागली असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. या आगीमध्ये काही दुकाने जळून खाक झाली आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ही घटना कांदिवली पूर्वेला अशोक चक्रवर्ती रोडवर बोनेनझा इस्टेट येथे शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.
कांदिवलीमध्ये बोनेनझा इस्टेट येथे एका दुमजली इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या, सात पाण्याचे टँकर आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या आगीत चार ते पाच दुकाने आणि गोदामे जळून खाक झाली. आगीत अडकलेल्या काही लोकांची सुखरूप सुटका करण्यात अग्निशमन दलाला मात्र यश आलं. आग नेमकी कशामुळे लागली याचे नेमके कारण अद्यापही समजू शकलेले नाही.