आजच्या युगातल्या मुली नवनवीन शिखर गाठत असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत असताना पाहायला मिळते.
कोल्हापूर- आजच्या युगातल्या मुली नवनवीन शिखर गाठत असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत असताना पाहायला मिळते. मात्र ‘मुलगाच पाहिजे’ अशा मानसिकतेमध्ये राहणा-या नागरिकही अजून काही भागात आहेत. याचीच प्रचिची कोल्हापूरमध्ये आली आहे.
दुसरी मुलगी झाली म्हणून जन्मदात्या आईने आणि आजीने नवजात मुलीला जिवंत पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने त्या बालिकेला जिवंत बाहेर काढण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
सारिका लखन मोरे आणि तिची आई नकुशा सिद्राम भोसले या मायलेकींवर गुन्हा दाखल केला आहे. कोल्हापूरमधील गडमुडशिंगीत हा प्रकार उघडकीस आला. मुलगी झाल्याने नवरा नांदवणार नाही, या धाकाने या दोघींनी हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
लखन असे सारिकाच्या पतीचे नाव आहे. सारिका लखनची दुसरी पत्नी आहे. पहिल्या पत्नीपासून लखनला चारही मुली झाल्यामुळे त्याने तिला सोडून दिले होते. आणि सारिकाबरोबर दुसरे लग्न केले. सारिकालाही पहिली मुलगीच झाली. दुसरी मुलगी झाली तर नांदवणार नाही, अशी धमकी लखनने सारिकाला दिली होती.
सारिकाला दुसरीही मुलगी झाल्याने सरिका आणि तिची आई हताश झाली. अखेर त्यांनी मुलीला पोत्यात भरुन रेल्वे रुळाजवळ खड्डा खणून त्यात पुरले. परिसरातील महिलांना माय-लेकीच्या वागण्याची शंका आल्याने त्यांनी दोन्ही महिलांकडे चौकशी केली. त्यावेळी हा प्रकार समोर आला.
पोलिसांसमोर या दोघींनी याबाबत कबुली दिल्यानंतर त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन त्या नवजात बालिकेला बाहेर काढले. त्या बालिकेला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.