सर्वसामान्यांना परवडणा-या दरातील घरे’ असे धोरण असलेल्या म्हाडाच्या सोडतीत अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटात आमदार-खासदारांसाठी आरक्षण ठेवले आहे.
मुंबई- मुंबईत परवडणा-या दरात स्वत:चे हक्काचे घर मिळावे, यासाठी सर्वसामान्य म्हाडा सोडतीची प्रतीक्षा करत असतात. अखेर बुधवारी म्हाडाद्वारे यंदाच्या सोडतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून सोडतीत ९७२ घरांचा समावेश आहे. ‘सर्वसामान्यांना परवडणा-या दरातील घरे’ असे धोरण असलेल्या म्हाडाच्या सोडतीची जाहिरात पाहून सर्वसामान्य अवाक् झाले, कारण अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटात आमदार-खासदारांसाठी आरक्षण ठेवले आहे. याची गंभीर दखल माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी घेतली असून आमदार-खासदारांना उच्च उत्पन्न गटासाठी आरक्षित ठेवावे, या मागणीचे पत्र मुख्यमंत्री आणि म्हाडा उपाध्यक्ष एस. एस. झेंडे यांना लिहिले आहे.
मुंबईच्या विविध भागातील ९७२ घरांची १० ऑगस्ट रोजी सोडत काढली जाणार आहे. अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी घरे उपलब्ध आहेत. अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटामध्ये तगडा भत्ता, मोठा पगार असलेल्या आमदार-खासदारांना आरक्षण दिल्याने गलगली यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
अत्यल्प उत्पन्न गटासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा २५ हजारपर्यंत असून अल्प उत्पन्न गटासाठी २५ हजार १ ते ५० हजारपर्यंत आहे. आमदार-खासदारांचा पगार, भत्ता मिळून महिन्याला किमान ५०-६० हजारपर्यंतचे वेतन मिळते. तसेच विविध सोयींमध्ये त्यांना सुटही असते. शिवाय त्यांना सुसज्ज निवास, बंगले, सोसायटी असतात. असे असताना त्यांना मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासह अत्यल्प, अल्प उत्पन्न गटासाठी आरक्षण का? असा सवाल गलगली यांनी केला आहे.
आमदार-खासदारांना आरक्षण कुठे?
* अत्यल्प उत्पन्न गट – चांदिवली येथे १ घर, मानखुर्द येथे १ घर.
* अल्प उत्पन्न गट – गोरेगाव (प.) येथे २ घरे, पत्राचाळ (गोरेगाव) येथे ४ घरे, मानखुर्द येथे १ घर, मालवणी (मालाड) येथे २ घरे
* मध्यम उत्पन्न गट – १५३ डी टिळकनगर, चेंबूर येथे शिल्लक असलेले एकमेव घर. याचा अर्थ या ठिकाणी आमदार-खासदार वगळता कुणालाच अर्ज करता येणार नाही.