अंधेरी परिसरात आठ जणांनी विवाहितेवर पतीसमोरच सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेने मुंबईत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मुंबई- अंधेरी परिसरात आठ जणांनी विवाहितेवर पतीसमोरच सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेने मुंबईत तीव्र संताप व्यक्त होत आहे. विवाहिता दोन मुलांची आई आहे. अंधेरी परिसरात घर पाहण्यासाठी हे दाम्पत्य गेले होते. त्यावेळी आठ जणांनी पीडितेवर अचानक हल्ला केला. याप्रकरणी सात जणांना अटक झाली असून एक जण फरार आहे.
या घटनेमुळे मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून मुंबईसह राज्यात गुन्हेगारीचा आलेख सातत्याने उंचावत असल्याचे उघड झाले आहे. गुन्हेगारी व अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता तुम्हीच बोला, हीच का महिलांची सुरक्षा, अशी संतप्त प्रतिक्रिया सर्व स्तरातून उमटत आहे. अंधेरी पश्चिम आंबोली परिसरातील शामनगर झोपडपट्टीत सोमवारी मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली.
पाडव्यानिमित्त मुंबईत नवे घर शोधण्यासाठी गेलेल्या २८ वर्षीय महिलेवर तिच्या पतीसमोर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडित महिला व तिचा पती स्थानिक महिलेच्या मदतीने शामनगरमधील झोपडपट्टीत घर शोधत होते. रात्री हे दाम्पत्य या महिलेच्या घरातच थांबले. मात्र, रात्री उशीर झाल्याने त्यांना मदत करणारी महिला तिच्या घरी निघून गेली.
त्यावेळी या परिसरात दबा धरून बसलेल्या एका टोळक्याने या झोपडीत प्रवेश केला. इतकेच नाहीतर पती-पत्नीला घराला कडीकोयंडा लावून आतून कोंडले. त्यानंतर महिलेच्या पतीचे हातपाय बांधून पतीच्या डोळय़ादेखत आठ जणांनी महिलेवर अत्याचार केला. हे सर्व आरोपी २० ते ३० वयोगटांतील आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पीडित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.
या पीडित महिलेची प्रकृती आता स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडिता दोन मुलांची आई असल्याचे पोलिसांकडून समजते. आंबोली पोलिसांनी सात जणांना अटक केली असून यातील एक आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. अटक आरोपींपैकी चार जणांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. उर्वरित चार जणांनी त्यांना या गुन्ह्यात साथ केल्याचे समोर आले आहे.