सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चारही पालिकांवर काँग्रेस आघाडीचाच नगराध्यक्ष बसणार असल्याचा विश्वास माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चारही पालिकांवर काँग्रेस आघाडीचाच नगराध्यक्ष बसणार असल्याचा विश्वास माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला. नगरपालिका निवडणूक प्रचारासाठी सोमवारी सावंतवाडीत झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. युती सरकारबरोबरच नोटाबंदीचादेखील त्यांनी कडाडून समाचार घेतला. माजी मुख्यमंत्री तथा आमदार नारायण राणे यांची सोमवारी सावंतवाडी येथे जाहीर सभा झाली. या वेळी माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डाँट्स, जिल्हा बँक चेअरमन सतीश सावंत, महिला जिल्हाध्यक्ष प्रणिता पाताडे, तालुकाध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदीप कुडतरकर तसेच आघाडीचे उमेदवार उपस्थित होते.
जे उमेदवार नगराध्यक्षपदासाठी दुसरा उमेदवार तयार करू शकत नाही ते विकास काय करणार? बबन साळगावकर यांनी आपला स्वाभिमान गहाण ठेवला, अशी टीका तालुकाध्यक्ष संजू परब यांनी या वेळी केली. गेल्या २० वर्षात सावंतवाडी भकास झाल्याची टीका नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदीप कुडतरकर यांनी केली. कणकवलीतल्या एका बांडगुळामुळे मागच्या निवडणुकीत १७-० झाले, असा टोला राजन तेली यांचे नाव न घेता कुडतरकर यांनी लगावला. स्वच्छ आणि सुंदर सावंतवाडीत जिकडे तिकडे दरुगधी आहे. सावंतवाडी यापूर्वी अशी नव्हती. त्यामुळे करपलेली भाकरी आता परता, असे आवाहन माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी सावंतवाडीकरांना केले. स्वत:च्या स्वार्थासाठी शरद पवार साहेब, नारायण राणे साहेब आणि सावंतवाडीचे माजी आमदार जयानंद मठकर यांचा वापर केला, असा आरोपही नामदार केसरकर यांचे नाव न घेता भोसले यांनी केला. आमच्याकडे जादू नाही केवळ विश्वास आहे, असा उद्बोधक टोलाही प्रवीण भोसले यांनी लगावला.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डाँटस, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनीदेखील विरोधकांवर हल्ला चढवत सावंतवाडीकरांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देण्याचे आवाहन केले. माजी खासदार निलेश राणे यांनी तुफान फटकेबाजी करत विरोधकांवर हल्ला चढवला. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची तोफ पालकमंत्री, नोटाबंदीवर चांगलीच धडाडली.