अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’च्या खजिन्यातील महत्त्वपुर्ण व्हिडिओ आता सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार आहेत.
न्यूयॉर्क- अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’च्या खजिन्यातील महत्त्वपुर्ण व्हिडिओ आता सर्वसामान्य नागरिकांना पाहता येणार आहेत. नासा आपल्या मोहिमा, उड्डाणे युट्यूब आणि नासाच्या वेबसाईटवर अपलोड करणार आहे.
नासाने आतापर्यंत अनेक मोहिमा, उड्डाणे यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. हे ऐतिहासिक व्हिडिओ तसेच अवकाशात संशोधनादरम्यान संस्थेने केलेली कामगिरी सर्वसामान्य नागरिकांना पाहता यावी, यासाठी नासाने हे पाऊल उचलले आहे.
‘नासा’च्या आर्मस्ट्राँग फ्लाइट रिसर्च सेंटरने (एएफआरसी) हे ऐतिहासिक व्हिडीओ अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ऐतिहासिक मोहिमा, उड्डाणे आणि लँडिंगचे शेकडो व्हिडीओ आर्काइव्ह्जमधून खुले करण्यात येणार आहेत.
आतापर्यंत एएफआरसीची व्हिडीओ लायब्ररी ड्रायडेन फ्लाइट रिसर्च सेंटरच्या (एएफआरसीचे पूर्वीचे नाव) वेबसाइटवर ड्रायडेन एअरक्राफ्ट मूव्ही कलेक्शनअंतर्गत उपलब्ध होती. मात्र आता हे सर्व व्हिडीओ यूट्युबवर उपलब्ध असल्याने गुगल सर्च इंजिनद्वारे शोधणे शक्य होणार आहे.
५०० व्हिडीओपैकी सुमारे ३०० व्हिडीओचे अपलोडिंग पूर्ण झाले आहे. यातील काही व्हिडीओ कित्येक दशके जुने आहेत. या व्हिडीओमध्ये १९४७ मधील ‘डी ५५८ स्कायस्ट्रीक’ विमानाची जोडणी, १९९१ मधील ‘लॉकहीड मार्टिन एसआर ७१ स्टेल्थ जेट’चे उड्डाण इथपासून ते अलीकडच्या, म्हणजेच २००४ मधील ‘एक्स ४३ ए’ या मानवरहित हायपरसॉनिक उड्डाण या चाचण्यांचा समावेश आहे.