नितेश राणे यांच्यामुळे सरकारच्या तिजोरीत २२ लाख रुपयांचा निधी जमा होणार आहे.
देवगड- देवगड समुद्र किना-यावर आठ वावाच्या आत मच्छीमारी करणा-या पर्सनेट नौकेतील पकडलेल्या मच्छीची किंमत कमी दाखवून मत्स्यव्यवसाय विभागाने केवळ ३३ हजार रुपयांचा दंड केला होता. ही बाब आ. नितेश राणे यांना कळताच त्यांनी थेट तहसीलदार कार्यालयात धाव घेऊन मासळीची खरी किंमत लावण्यास भाग पाडले. त्यामुळे ३३ हजार रुपयांचा दंड थेट २२ लाख ५० हजार रुपयांवर पोहोचला. नितेश राणे यांच्यामुळे सरकारच्या तिजोरीत २२ लाख रुपयांचा निधी जमा होणार आहे.
देवगड येथील समुद्र किना-यावर आठ वावाच्या आत मच्छीमारी करताना देवगड येथील द्विजकांत कोयंडे यांची पर्सनेट नौका दंड भरण्याआधी मच्छीमारी बोट परवाना अधिकारी वारुंजीकर यांनी सोडून दिल्याने आ. नितेश राणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दंड भरण्याआधी बोट सोडून का देता? आता हा दंड वसूल न झाल्यास व सरकारचे नुकसान झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्नही त्यांनी केला. हे देवगड आहे. इथे आमदार नितेश राणे आहेत. तिकडे मालवणमध्ये जे चालते ते येथे चालविण्याचा प्रयत्न कराल, तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही नितेश राणे यांनी मच्छीमार अधिका-यांना दिला.
जानकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क
मत्स्य व्यवसाय खात्याच्या अधिका-यांकडून पर्सनेट मच्छीमारांना पाठीशी घालून पारंपरिक मच्छीमारांवर कसा अन्याय होतो, याची माहिती नितेश राणे यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून दिली. बेकायदेशीर मच्छीमारी करणा-यांवर कडक कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच त्यांचे परवाने रद्द करावेत व अधिका-यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. आमदार नितेश राणे यांची तळमळ पाहून महादेव जानकर यांनी त्याच दूरध्वनीवरून परवाना अधिकारी वारुंजीकर यांना कडक कारवाईचे आदेश दिले. भविष्यात असे प्रकार होणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचनाही केल्या.
[EPSB]
मुंबईतील खासगी बसचालक मंगळवार, बुधवारी संपावर
मुंबई- वाहतूक विभागाने मुंबईत लागू केलेल्या निर्बंधाविरोधात मुंबई महानगर क्षेत्रातील सुमारे ३३ हजार खासगी बसेस पुढील मंगळवार दि. १९ आणि बुधवार दि. २० सप्टेंबर असे दोन दिवस संपावर जाणार आहेत.
[/EPSB]