ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या घेतलेल्या निर्णयाने जगभरातील शेअर बाजारांत अनिश्चिततेची राजवट आणली आहे, अशी भावना जागतिक वर्तुळात व्यक्त होत आहे.
लंडन- ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या घेतलेल्या निर्णयाने जगभरातील शेअर बाजारांत अनिश्चिततेची राजवट आणली आहे, अशी भावना जागतिक वर्तुळात व्यक्त होत आहे.
युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन ब्रिटनने देशात आणि जगालाच जोरदार धक्का दिला. पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांना राजीनामा द्यावा लागला. परंतु आता जग अनिश्चिततेच्या भोव-यात सापडले आहे.
ब्रिटनमध्ये या मुद्दयावर मोठी फूट पडली आहे. ईयूतून बाहेर पडणा-यांना युरोपीय नोकरशाहीच्या कचाटयातून ब्रिटिश लोकशाहीची सुटका झाली, असे वाटते आहे. बाहेर पडण्याच्या बाजूने जोरदार प्रचार करणारे लंडनचे माजी महापौर बोरिस जॉन्सन यांच्या मते ब्रिटिश जनतेने ब्रिटन आणि युरोपात लोकशाहीची हाक दिली आहे.
तर कट्टरवाद्यांचे नेते निगेल फराज यांच्या मते ब्रिटनमध्ये पहाट उगवली आहे. मात्र ज्या ४८ टक्के लोकांनी ईयूमध्ये राहण्याच्या बाजूने मतदान केले त्यांची घोर निराशा झाली आहे.
ब्रिटनच्या या निर्णयानंतर जगभरातील शेअर बाजार कोसळले. जर्मनीतील शेअर बाजार १२ टक्क्यांनी कोसळला तर जपान आणि ब्रिटनमधील बाजार ८ टक्क्यांनी कोसळले.