मालवणातील युवा रांगोळीकार साईनाथ पारकर याने आपल्या बोटांतील जादुई कलेने अतीनील किरणांत आकर्षक दिसणा-या रांगोळी रेखाटल्या आहेत.
मालवण- मालवणातील युवा रांगोळीकार साईनाथ पारकर याने आपल्या बोटांतील जादुई कलेने अतीनील किरणांत आकर्षक दिसणा-या रांगोळी रेखाटल्या आहेत. असे धाडस प्रथमच सिंधुदुर्गात एका रांगोळीकाराने दाखवले आहे. पारकर याने अल्पावधीत मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या अल्ट्रा वॉयलेट रांगोळी पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने येणा-या रसिकांकडून कौतुक होत आहे. सोशल मीडियावरही साईच्या रांगोळींवर कौतुकाचा वर्षात होत आहे.
या अतीनील किरणांच्या रांगोळय़ांना ‘युव्ही लाईट रांगोळी’ असे म्हणतात. आतापर्यंत संस्कार भारती, ठिपक्यांची रांगोळी, थ्रीडी रांगोळी असे रांगोळीचे विविध प्रकार आपल्यासमोर आले आहेत; मात्र यूव्ही लाईटचा वापर करून रांगोळी काढण्याचा धाडसी आणि अनोखा प्रयोग प्रथमच साईनाथ पारकर याने केला आहे. यात विविध रंगांचा आणि यूव्ही किरणांचा त्यावर पडणारा प्रभाव यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास महत्त्वाचा आहे.
साईने २०१४ मध्ये मुंबईच्या रहेजा कॉलेजमधून कमर्शियल आर्टमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर मुंबई, दिल्ली तसेच मालवणातील विविध कार्यक्रमांत रंगांची उधळण करत ब-याच सुंदर रांगोळी त्याने साकारल्या आहेत. यूव्ही लाईटचे गुणधर्म हे आपल्या रोजच्या लाईटपेक्षा वेगळे असतात. त्यांचा रांगोळीच्या रंगावर होणारा परिणाम लक्षात घेऊन या प्रदर्शनात सात रांगोळी साकारण्यात आल्या आहेत.
यूव्ही लाईटमध्ये काढलेल्या रांगोळी अधिक जिवंत वाटतात. रसिकांना कलेचा नवा नजराणा बहाल करावा, या उद्देशाने मालवणच्या पालखी सोहळय़ानिमित्त हा उपक्रम राबवल्याचे त्याने स्पष्ट केले. हे प्रदर्शन मोफत असून मालवणकर आणि जिल्ह्यातील कलेवर प्रेम करणारे रसिक उत्स्फूर्तपणे पाहण्यासाठी येत आहेत, असेही त्याने सांगितले. या प्रदर्शनासह युवा छायाचित्रकार मयु नानाशेठ पारकर यांच्याही छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सारस्वत बँकेनजीकच्या एका सभागृहात भरवण्यात आले आहे.