मोबाईल आणि इंटरनेट सेवा क्षेत्रातील धमाक्यानंतर रिलायन्स आता ब्रॉडबँड सेवा क्षेत्रातही पदार्पण करत आहे.
मुंबई- मोबाईल आणि इंटरनेट सेवा क्षेत्रातील धमाक्यानंतर रिलायन्स आता ब्रॉडबँड सेवा क्षेत्रातही पदार्पण करत आहे. याबद्दलची घोषणा रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत केली. रिलायन्सकडून जिओ गिगा टीव्ही सुरू करण्यात येणार आहे. यामुळे भारतीयांची टीव्ही पाहण्याची पद्धत बदलेल, असा विश्वास अंबानी यांनी व्यक्त केला.
रिलायन्स जिओने आता जिओ गिगा टीव्ही लाँच केला असून रिलायन्स जिओचा नवा फोनही भेटीला येणार आहे. तसेच आता १५ ऑगस्टपासून जिओ फोनवर यूट्यूब, फेसबुक आणि व्हॉट्सअप फुकटात उपलब्ध होणार आहे.
मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश आणि मुलगी ईशा यांनी या सभेत जिओच्या नव्या उत्पादनांचे सादरीकरण केले. अंबानींची होणारी सून श्लोका ही देखील यावेळी उपस्थित होती.
यावेळी ईशा आणि आकाश यांनी जिओ २ फोनसह गीगा टीव्ही, सेटटॉप बॉक्स आणि गीगा राऊटरही लाँच केला. १५ ऑगस्टपासून हा फोन व टीव्ही उपलब्ध असेल.
यावेळी मुकेश अंबानी यांनी सांगितले की, जिओच्या गिगा टीव्हीमध्ये व्हॉईस कमांड असेल. टीव्हीच्या सेट टॉपबॉक्समध्ये सर्व भारतीय भाषांमध्ये व्हॉईस कमांड असतील.
जिओ हे भारतातील सर्वात वेगवान नेटवर्क आहे, देशाचा प्रत्येक कोपरा जिओने जोडणार आहे, जियो ‘फिक्सड लाइन ब्रॉडबँड’चे क्षेत्र विस्तारणार असल्याचेही मुकेश अंबानी म्हणाले.
यावेळी मुकेश अंबानी यांनी २०१७- २०१८ या आर्थिक वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा २०.६ टक्क्यांनी वाढून ३६,०७६ कोटी रुपयांवर पोहोचल्याचे सांगितले.
जिओ गिगा टीव्ही व्हाईस कमांड आणि रिमोटने चालेल. यासोबतच जिओ गिगा टीव्हीमध्ये कॉलिंगची सुविधादेखील उपलब्ध असेल. यामुळे एका जिओ गिगा टीव्हीवरुन दुस-या जिओ टीव्हीवर फोन लावता येईल. याशिवाय जिओ गिगा टीव्हीवरुन मोबाईलवरही कॉल करता येईल. या टीव्हीला व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट लावल्यास ३६० अंशातील व्ह्यू पाहता येईल.
अतिरिक्त गुंतवणूक न करताही गेल्या काही महिन्यात जिओची क्षमता दुपटीने वाढली आहे. जिओ आणि रिटेल क्षेत्राची वाढ २ वरून १३ टक्क्यांवर गेली आहे. जिओचे सध्या २१५ दशलक्ष (२१ कोटी ५० लाख) युजर्स आहेत. दररोज जिओवर २४० कोटी जीबी डेटाचा वापर होतो. भारतातले सर्वात वेगवान नेटवर्क म्हणून पहिले स्थान जिओने कायम ठेवले आहे, अशी माहिती यावेळी मुकेश अंबानी यांनी दिली.
तसेच जिओची ब्रॉडब्रँड सेवा सर्वात स्वस्त असेल, असे अंबानी यांनी म्हटले आहे. त्यामुळे मोबाईल इंटरनेट सेवा क्षेत्राप्रमाणेच ब्रॉडब्रँड क्षेत्रातही आता रिलायन्स जिओ आणि इतर कंपन्यांमध्ये तीव्र स्पर्धा होण्याची शक्यता आहे. याशिवाय जिओ गिगा राऊटर, गिगा टीव्ही सेटटॉप बॉक्स आणि गिगा टीव्ही कॉलिंग सेवेचेही घोषणा करण्यात आली आहे.
जिओ अॅपद्वारे घरातील सर्व उपकरणे चालणार
आता आपल्या घरातील फ्रीजपासून लाईटपर्यंत सर्व उपकरणे जिओ अॅपद्वारे चालतील. जिओ स्मार्ट होम सोल्यूशनची सेवा १५ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. याचाच अर्थ तुमच्या घरातील टीव्ही, कॅमेरा, प्लग्ज दरवाजे इत्यादी तुमच्या आवाजानेच कंट्रोल होतील. हे सगळे जिओ अॅपद्वारे शक्य आहे.
जिओ फोन २ लॉन्च
रिलायन्सने आज जिओ फोन २ ही लॉन्च केला आहे. जिओ फोन २ ची किंमत २,९९९ रुपये निश्चित करण्यात आली आहे. तुम्ही ५०१ रुपये देऊन तुमच्या जुन्या फोनच्या बदल्यात नवा जिओ फोन २ खरेदी करु शकता. १५ ऑगस्टपासून हा फोन मिळेल. जिओफोनवर आता यूट्यूब, फेसबुक आणि व्हॉट्सअप फुकटात उपलब्ध होणार आहे.
महत्त्वाच्या घोषणा
- रिलायन्स जिओ मध्ये यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअॅप फ्री
- जिओ गिगा टीव्ही लाँच, व्हॉईस कमांडवर टीव्ही चालणार
- गीगा राऊटर लाँच, १.१ टीबी (टेराबाईट्स) फ्री डेटा १०० एमबीपीएस स्पीड
- गीगा होम लाँच, फ्रीजपासून लाईटपर्यंत सर्व उपकरणे जिओ अॅपद्वारे चालणार
एमबीपीएस नव्हे जीबीपीएस
एमबीपीएसमध्ये इंटरनेट वापरण्याचा जमाना गेला, आता जीबीपीएसचा जमाना आहे, असे ईशा अंबानी म्हणाल्या.
जिओ गिगा फायबर
रिलायन्स सध्या दहा हजार घरांवर जिओ गिगा फायबरची चाचणी करत आहे. येत्या १५ ऑगस्टपासून जिओ गिगा फायबरची नोंदणी सुरू होणार आहे.