सार्वजनिक ठिकाणांवरील अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत हरकती व सूचना नोंदवण्यासाठी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी तिस-यांदा मुदतवाढ दिली आहे.
मुंबई- सार्वजनिक ठिकाणांवरील अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत हरकती व सूचना नोंदवण्यासाठी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी तिस-यांदा मुदतवाढ दिली आहे. या धार्मिक स्थळांबाबत हरकती नोंदवण्यासाठी व सूचना करण्यासाठी १२ फेब्रुवारी ही अंतिम तारीख होती. परंतु त्यामध्ये वाढ करत ही मुदत २२ एप्रिल २०१३ पर्यंत दिली आहे.
मुंबई महापालिकेने २७ आणि २८ डिसेंबर रोजी रस्ते व पदपाथ आदी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी प्रसिद्ध केली होती. विश्वस्त व मंडळांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या. या सूचना करण्यासाठी २८ जानेवारी २०१३ ही अंतिम तारीख होती. त्यानंतर विविध संघटनांनी व व्यक्तींनी निवेदन सादर करून मुदतवाढ मिळावी म्हणून अर्ज केला होता.
त्यानुसार १२ फेब्रुवारी २०१३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी नागरिक आणि विविध संघटनांच्या भावना लक्षात घेऊन हरकती व सूचना सादर करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देत ही तारीख २२ एप्रिल २०१३ पर्यंत दिली.