कॅलिफोर्निया येथील हिंसाचारानंतर अमेरिकेत मुस्लिमांना प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी अमेरिकन रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.
वॉशिंग्टन- कॅलिफोर्निया येथील हिंसाचारानंतर अमेरिकेत मुस्लिमांना प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी अमेरिकन रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे भविष्यातील अध्यक्षपदाचे आघाडीचे नेते आहेत. ट्रम्प यांच्या विधानाचा अमेरिकन सरकारने व विरोधकांनी विरोध केला आहे.
दक्षिण कॅरोलिना येथील प्रचारमोहिमेत ट्रम्प यांनी ही वादग्रस्त मागणी पुढे रेटली आहे. ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेत येण्यास पूर्णपणे मुस्लिमांना बंदी घालण्यात यावी. कारण अमेरिकेसमोर आता कोणताही पर्याय नाही. सरकारने कडक पावले न उचलल्यास ९/११ सारखे हल्ले पुन्हा होऊ शकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
अमेरिकेत सुरक्षा धोरण ठरवणा-या संस्थेने जनमत चाचण्या घेतल्या. जागतिक जिहाद पाहता २५ टक्के अमेरिकनांनी हिंसाचार ग्राह्य धरला आहे. तर अमेरिकेतील मुस्लिमांना शरीयत कायदा लागू व्हावा यावर ५१ टक्के नागरिकांनी संमती दिली आहे.
अमेरिकेत द्वेषाचे वातावरण पसरत असून त्याची मर्यादा वाढत चालली आहे. हा द्वेष कुठून आला? आम्ही हा प्रश्न समजून घ्यायला हवा. आम्हाला जिहादचे बळी व्हायचे नाही, असे त्यांनी ठासून सांगितले.
डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी ट्रम्प यांच्या विधानाचा निषेध केला. त्यांचे विधान फुटीरतावादी व द्वेषपूर्ण आहे असे त्या म्हणाल्या. अमेरिकन इस्लामिक रिलेशन कौन्सिल या संस्थेनेही ट्रम्प यांच्या विधानाचा निषेध केला.