परळ येथील केईएम रुग्णालयात मागील अनेक वर्षापासून कोमामध्ये असलेल्या अरुणा शानबाग यांची तब्येत खालावल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे.
मुंबई- परळ येथील केईएम रुग्णालयात मागील अनेक वर्षापासून कोमामध्ये असलेल्या अरुणा शानबाग यांची तब्येत खालावल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे.
निमोनिया आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने मागील तीन दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.
तसेच रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून अरुणाची काळजी घेण्यात येत असून त्यांच्याकडूनही उपचारांना प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अरुणा यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होईल, असेही डॉ. सुपे यांनी सांगितले. अरुणा शानबाग रुग्णालयात पारिचारिका म्हणून कार्यरत होत्या.
१९७३ मध्ये रुग्णालयातील एका वॉर्डबॉर्यने त्यांच्यावर पाशवी बलात्कार केला होता. या वेळी झालेल्या मारहाणीत अरुणा यांच्या मेंदूची नस दुखावली गेली होती. तेव्हापासून त्या कोमातच आहेत. रुग्णालयातील परिचारिका आणि डॉक्टर्स त्यांची काळजी घेतात. परंतु, अरुणा यांची अवस्था खूपच बिकट आहे. त्यामुळे काही वर्षापूर्वी अरुणा यांची एक मैत्रीण पिंकी विराणी यांनी अरुणा यांना दया मरण द्यावे, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. परंतु, दया मरणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. दरम्यान, अरुणावर बलात्कार करणारा वॉर्डबॉय शिक्षा भोगून बाहेरही पडला आहे. मात्र, अरुणा यांचा संघर्ष अद्याप सुरूच आहे.