राज्य सरकारने पर्सेसीन नेटद्वारे मासेमारीसाठी खोल समुद्रात १२ नॉटिकलच्या पुढे परवानगी देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
मुंबई- राज्य सरकारने पर्सेसीन नेटद्वारे मासेमारीसाठी खोल समुद्रात १२ नॉटिकलच्या पुढे परवानगी देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे पारंपरिक मासेमारी व्यवसाय धोक्यात आला असून याविरोधात सोमवारी ‘पारंपरिक मच्छीमार सेवा समिती’कडून आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले.
पर्सेसीन नेट मासेमारीसंदर्भात पारंपरिक मच्छीमार संघटनांचे मत विचारात न घेता सरकारने घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचा आरोप यावेळी समितीकडून करण्यात आला.
सरकारने पर्सेसीन नेटच्या मासेमारीवर पूर्णपणे बंदी घालावी, कायदे तोडणा-या पर्सेसीन परवानाधारक बोटींवर कडक कारवाई करावी व दुप्पट दंड वसूल करावा, ज्या बोटी नियमांचे पालन करून मासेमारी करत नाहीत त्यांचा परवाना रद्द करावा, पारंपरिक मासेमारी करणा-यांची सर्व बाजू सरकारने समजून घेऊन कोणतेही निर्णय घ्यावेत आदी अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या.