महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत १० डबलडेकर बसचा समावेश करण्याच्या प्रस्तावला परिवहन समितीने शनिवारी मान्यता दिली.
ठाणे – महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत १० डबलडेकर बसचा समावेश करण्याच्या प्रस्तावला परिवहन समितीने शनिवारी मान्यता दिली. वाढत्या नागरिकरणामुळे सध्या असलेल्या बसची संख्या अपुरी पडत असल्याने शनिवारी पार पडलेल्या सभेत जेएनएनआरयूएमअंतर्गत १० दुमजली बसचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश सदस्यांनी परिवहन व्यवस्थापकांना दिले आहेत.
ठाणे शहराचा वाढता विस्तार आणि विकास झपाटय़ाने होत आहे. त्यामुळे दुमजली बस सेवा काळाची गरज आहे, असे मत स्थायी समिती सभापती रवींद्र फाटक यांनी व्यक्त केले. बेस्ट उपक्रमानंतर कल्याण-डोंबिवली मनपानेही डबलडेकर बसला प्रारंभ केला आहे.
त्यामुळे टीएमटीच्या ताफ्यात १० डबलडेकर बस जेएनएनआरयूअंतर्गत आणण्यासाठी तात्काळ प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश सदस्यांनी व्यवस्थापकांना दिले आहेत. डबलडेकर बसमुळे प्रवासी वाहून नेण्याची क्षमता डबल होणार आहे.