आपण उपसचिव भा. र. गावित यांना कोणतीही मारहाण केलेली नाही. मारहाण केली असती तर मान्यही केले असते. मी सरकारी कर्मचा-याला न्याय मिळावा म्हणून त्यांच्याकडे गेलो होतो.
मुंबई- आपण उपसचिव भा. र. गावित यांना कोणतीही मारहाण केलेली नाही. मारहाण केली असती तर मान्यही केले असते. मी सरकारी कर्मचा-याला न्याय मिळावा म्हणून त्यांच्याकडे गेलो होतो.
माझे कोणतेही वैयक्तिक काम नव्हते. मात्र मी भ्रष्टाचार बाहेर काढतो म्हणून मला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. आमदारावर दबावतंत्राचा वापर करण्यासाठी सरकारी अधिका-यांचा हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. दरम्यान, विधिमंडळाच्या आवारात बुधवारी दाखल झालेले आमदार बच्चू कडू रात्री उशिराने पोलिसांना शरण गेले.
एका सरकारी कर्मचा-याला मुख्यमंत्री कोटयातून घर मिळाले होते. मात्र त्याची पत्नी आजारी असल्याने वांद्रे शासकीय निवासस्थानी राहण्याची मुदत दोन वर्षानी वाढवून मिळावी, अशी विनंती त्यांनी केली होती. हे प्रकरण गावित यांच्याकडे होते.
संबंधित कर्मचा-याने मला मदतीची विनंती केली. त्यानुसार मी गावित यांच्याकडे गेलो. हा कर्मचारी गयावया करत असताही गावित यांनी त्याला उर्मटपणे उत्तर देत मुख्यमंत्र्यांना जाऊन विचारा, असे सांगितले. त्यावेळी आपण गावित यांना जाब विचारला. त्यावर आपण त्यांना मारहाण केल्याची खोटी आवई गावित यांनी उठवली.
आंदोलन सोमवापर्यंत स्थगित
मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय तसेच अतिरिक्त मुख्य सचिव गृह के. पी. बक्षी यांच्यासोबत कर्मचारी-अधिकारी संघटनांच्या प्रतिनिधींनी चर्चा केली आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता मंत्रालयीन कर्मचा-यांचे आंदोलन सोमवापर्यंत स्थगित केले.