प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईने तीन ऑनलाइन अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई – प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईने तीन ऑनलाइन अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. १५ ते ७५ वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांचा लाभ घेता येणार आहे. यासह विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी धडे देता यावेत महाविद्यालयीन शिक्षकांसाठी ऑनलाइन प्रशिक्षण आणि कार्यशाळा घेण्यात येणार असून सुमारे १० हजार शिक्षकांना ट्रेन करण्याचा निर्धार आयआयटीने केला आहे.
आयआयटी मुंबईने ‘आयआयटीबॉम्बेएक्स’ या उपक्रमाची घोषणा गुरुवारी आयआयटी पवई येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली. या अभ्यासक्रमानुसार कम्प्युटर प्रोग्रामिंगची ओळख, थर्मोडीनमिक्स, सिग्नल अॅण्ड सिस्टम हे तीन ऑनलाइन अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
कम्प्युटर प्रोग्रामिंगची ओळख आणि सिग्नल अॅण्ड सिस्टम हे दोन अभ्यासक्र म दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. दोन्ही टप्पे आठ आठवडय़ाचे असणार आहेत. तर थर्मोडीनमिक्स हा अभ्यासक्रम १२ आठवडयांचा आहे.
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार असून यामध्ये उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. हिंदी आणि इंग्रजी भाषेत हे अभ्यासक्रम उपलब्ध असतील. अभ्यासक्रमाचे प्रवेश फ्रेबुवारीच्या पहिल्या आठवडय़ात सुरु होणार असून मार्च २०१५ पासून अभ्यासक्रम सुरु होतील.