एसटी महामंडळाच्या ताफ्यातील चार शिवनेरी बस अपु-या कागदपत्रांअभावी आरटीओच्या कचाटय़ात सापडल्यानंतर उर्वरित ४५ बसची कागदपत्रेही एसटी महामंडळ तपासून घेणार आहे.
मुंबई – एसटी महामंडळाच्या ताफ्यातील चार शिवनेरी बस अपु-या कागदपत्रांअभावी आरटीओच्या कचाटय़ात सापडल्यानंतर उर्वरित ४५ बसची कागदपत्रेही एसटी महामंडळ तपासून घेणार आहे. याकरता बसबाबतची सर्व माहिती आरटीओला देण्याची तयारी महामंडळाने केली असून ताडदेव आरटीओकडून ही तपासणी करण्यात येणार आहे. शिवाय, अपुरी कागदपत्रे आढळलेल्या बस कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महामंडाळातील एका अधिका-याने दिली.
सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील ४९ शिवनेरी बस कार्यरत आहेत. या सर्व बस एकूण सहा ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. यापैकी ४ बसच्या फिटनेस संदर्भातील कागदपत्रांची मुदत १४५ दिवसांपूर्वी संपली होती. त्यामुळे आरटीओने केलेल्या कारवाईनंतर जाग आलेल्या एसटी महामंडळाने उर्वरित ४५ गाडय़ांची कागदपत्रेही तपासणी करून घेण्याची तयारी दर्शविली आहे. याकरता बसचे नंबर आरटीओला देण्यात येणार असून आरटीओमार्फत ही कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, आरटीओने गुरुवारी केलेल्या कारवाईत कागदपत्रांअभावी जप्त करण्यात आलेल्या बसमालकांकडून दंड वसूल केला आहे. यामध्ये एम एच-०४ एफ के-१३३७ या बसला ५२,८५१ आणि एम एच-४ एफ के-११०३ या बसला २१,०७८ एवढा दंड ठोठावण्यात आल्याचे आरटीओ अधिका-याने सांगितले.
ट्रॅव्हल्स कंपन्यांना नोटीस
आरटीओने केलेल्या कारवाईनंतर बसच्या अपु-या कागदपत्रांअभावी महामंडळाची नाचक्की झाल्याने संबंधित दोन ट्रॅव्हल्स कंपन्यांना नोटीस बजावण्याचा निर्णय शुक्रवारी महामंडळातील वरिष्ठ अधिका-यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामध्ये एस. एस. ट्रॅव्हल्स आणि के. के. ट्रॅव्हल्स या कंपन्यांची नावे समोर आली आहेत. त्यानुसार महामंडळासोबत करण्यात आलेला या कंपन्यांचा करार रद्द करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.