मेट्रो-३ प्रकल्पाचा आराखडा बनवताना तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे.
मुंबई- मेट्रो-३ प्रकल्पाचा आराखडा बनवताना तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे. अभियांत्रिक, पर्यावरणतज्ज्ञ, सल्लागार यांची मदत घेत आणि तांत्रिक बाजूंची पडताळणी करूनच मेट्रो-३चा मार्ग आणि स्थानकांची रचना करण्यात आली आहे.
बांधकामासाठीची निविदा प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मेट्रो-३ मार्गाच्या रचनेत कोणताही बदल करणे किंवा स्थलांतर करणे शक्य नाही, या आशयाचे पत्रक ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’द्वारे (एमएमआरसी) ‘सेव्ह आरे कॉलनी’ संघटनेला पाठवण्यात आले आहे.
आरे कॉलनी येथील प्रस्तावित कारडेपोला ‘सेव्ह आरे कॉलनी’ संघटना, रहिवाशांनी विरोध दर्शवला आहे. मात्र सद्यस्थितीत मेट्रो-३ मार्गात बदल, स्थलांतर करणे अशक्य असल्याचे एमएमआरसीचे म्हणणे आहे. त्यामुळे कारडेपो आरेच्या प्रस्तावित जागीच होईल, असे संकेत एमएमआरसीने पत्रकाद्वारे दिले आहेत.
[poll id=”1042″]
कुलाबा ते सिप्झ या ३२.५ कि.मी. भुयारी मेट्रो-३ मार्गाची रचना एमएमआरसीद्वारे केली जात आहे. या मार्गावर आरे कॉलनी येथे कारशेड बांधणे प्रस्तावित आहे. कारशेडच्या बांधकामामुळे हजारो झाडे कापली जाणार असल्याने आरे येथील रहिवासी, पर्यावरणप्रेमी संघटनांनी या कारशेडला तीव्र विरोध दर्शवला आहे.
रहिवाशांचा विरोध पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरे येथील प्रस्तावित कारशेडला पर्यायी जागा सुचवण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे. या समितीद्वारे बॅकबे रेक्लमेशन, मुंबई पोर्ट ट्रस्ट लॅन्ड, महालक्ष्मी रेसकोर्स, धारावी, वांद्रे-कुर्ला-संकुल, कलिना कॅम्पस आणि कांजुरमार्ग या पर्यायी जागा सुचवण्यात आल्या आहेत. या पर्यायी जागांबाबत समितीद्वारे अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.
आरेतील कारडेपोबाबात मुख्यमंत्र्यांद्वारे नेमण्यात आलेल्या समितीद्वारे पुढच्या आठवडयात अंतिम निर्णय अपेक्षित आहे. मेट्रो-३ प्रकल्पाचा आराखडा तज्ज्ञांच्या नजरेतून आणि मार्गदर्शनातून बनवण्यात आल्याने एमएमआरसी आपल्या नियोजनावर ठाम राहील, असे एमएमआरसीच्या एका अधिका-याने सांगितले.
आरेतील कारशेड स्थलांतरीत करून पर्यायी जागा शोधा या संदर्भाचे पत्रक ‘सेव्ह आरे कॉलनी’ संघटनेद्वारे एमएमआरसीला पाठवण्यात आले होते. मात्र एमएमआरसीद्वारे देण्यात आलेल्या उत्तरामुळे आरे वाचण्याची शक्यता धूसर झाल्याचे चित्र निर्माण झाल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये असंतोष पसरला आहे.
मुख्यमंत्र्यांद्वारे नेमण्यात आलेल्या समितीद्वारे आरेच्या कारडेपोबाबत अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आला नाही. त्या आधीच एमएमआरसीद्वारे आम्हाला मेट्रो-३ प्रकल्पाच्या रचनेत कोणतेच बदल करणे शक्य नसल्याच्या आशयाचे पत्रक आले. त्यामुळे आरेला स्थलांतरीत करण्याबाबत समिती नेमून निव्वळ वेळखाऊपणा करत धूळफेक करण्यात आली आहे.
– मनीष सेठी, सदस्य, सेव्ह आरे कॉलनी