मोफत अर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये देण्यात येणा-या २५ टक्के आरक्षणाचा मुंबई आणि ठाणे परिसरात यंदाही बोजवारा उडाला आहे.
मुंबई – मोफत अर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये देण्यात येणा-या २५ टक्के आरक्षणाचा मुंबई आणि ठाणे परिसरात यंदाही बोजवारा उडाला आहे. मुंबईतील श्रीमंत वस्तीतील अनेक शाळांनी आरक्षण देण्याचे सपशेल नाकारले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
आरक्षण नाकारणा-या शाळांमध्ये बडया लोकांच्या शाळांचा समावेश असून, शालेय शिक्षण विभागाने आपल्याला परिपत्रकच दिले नसल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, पालकांनाही भरुदड सहन करावा लागत आहे. याबाबत शाळांकडून पालकांना थातुरमातूर उत्तरे दिली जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
मुंबईत आरक्षण नाकारणा-या शाळांमध्ये अंधेरी, बीकेसी, गोरेगाव, वर्सोवा, भांडुप, मुलुंड, साकिनाका, मरोळ आणि ठाणे येथील अनेक खासगी शाळांचा समावेश आहे. या शाळांमध्ये आरक्षणाच्या संदर्भात पालकांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले जात नसून, आरक्षणाची माहितीच उपलब्ध नसल्याचेही सांगण्यात येते, अशी माहिती अनुदानित शिक्षण बचाओ समितीकडून देण्यात आली.
राज्य सरकारकडून १५ मार्च रोजी २५ टक्के आरक्षणाच्या संदर्भातील परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे. हे परिपत्रक शिक्षण विभागांतर्गत येणा-या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, राज्य शिक्षण मंडळ आदी सर्व मंडळांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच परिपत्रक जाहीर करण्यात आल्याची माहिती विविध प्रसिद्धीमाध्यमांतही प्रकाशित करण्यात आली आहे. यामुळे असे काही कारण सांगून आरक्षण नाकारण्याचा जर शाळांकडून प्रयत्न प्रयत्न केला जात असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
– बाळासाहेब माने, शिक्षण उपनिरीक्षक, मुंबई
सरकारने २५ टक्के आरक्षणासाठी परिपत्रक काढले असताना व त्यासाठी त्याची नियमावलीही दिलेली असताना, मुंबईत अनेक शाळा या नियमावली पायदळी तुडवत आहेत. बहुतेक शाळांच्या माहिती फलकांवर किती जागा शिल्लक आहेत, याची माहिती दडवण्यात येत आहे. काही शाळांनी तर २५ टक्के आरक्षणाप्रमाणे आपल्याला परिपत्रकच माहित नाही, सांगितले आहे. या शाळांचे हे म्हणणे खोडसाळपणाचे असून, आरक्षण नाकारण्याचे हे मोठे कारस्थान आहे.
– के. नारायणन, सचिव अनुदानित शिक्षण बचाओ समिती
आरक्षण नाकारणा-या शाळा
के. के. राज पूपट हायस्कूल
वर्सोवा वेल्फेअर हायस्कूल
सेंट मेरी स्कूल, अंधेरी (पू.)
स्वामी विवेकानंद, अंधेरी (पू.)
अर्नोल्ड स्कूल, अंधेरी (पू.)
कॅनोसा हायस्कूल अंधेरी (पू.)
एम. ए. हायस्कूल, अंधेरी (प.)
धिरुभाई अंबानी स्कूल, बीकेसी
राजहन्स विद्यालय, भवन्स कॅम्पस
एक्होल मोंडियल वर्ल्ड स्कूल, जेव्हीपीडी
बॉम्बे कँब्रिज स्कूल, अंबोली,
अंधेरी (प.)
एचव्हीपीएस इंटरनॅशनल स्कूल,
अंधेरी (प.)
निकुंज स्कूल, अंबोली लेव्हल क्रॉसिंग अंधेरी (पू.)