शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीवर उपचार करणा-या जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी गुरुवारी इंद्राणीला डेंग्युची लागण झाली नसल्याचे सांगितले.
मुंबई – शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीवर उपचार करणा-या जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी गुरुवारी इंद्राणीला डेंग्युची लागण झाली नसल्याचे सांगितले.
इंद्राणीच्या शरीरातील प्लेटलेट कमी झाल्याने बुधवारी तिला भायखळयाच्या महिला तुरुंगातून जे.जे.रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. इंद्राणीच्या शरीरातील प्लेटलेट कमी झाल्या असल्या तरी तिच्यावर डेंग्युचे उपचार सुरु नसल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाते टी.पी.लहाने यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
चाचणीमधून इंद्राणीला डेंग्यू नसल्याचे स्पष्ट झाले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर इंद्राणीच्या प्लेटलेटच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. प्रत्येकवेळी डेंग्यूमुळेच प्लेटलेट कमी होत नाहीत. कधीकधी तापामुळेही प्लेटलेटची संख्या घटते असे डॉ. लहाने यांनी सांगितले.
गुरुवारी संध्याकाळी इंद्राणीच्या डिस्चार्जवर निर्णय होईल असे त्यांनी सांगितले. इंद्राणीला बुधवारी महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश होते. मात्र इंद्राणीला डेंग्युची लागण झाल्याच्या संशयामुळे तिला काल न्यायालयात हजर केले नाही. सीबीआयला इंद्राणीच्या आवाजाचे नमुने हवे असल्याने न्यायदंडाधिकारी आर.व्ही.अडोने यांनी महिला तुरुंग प्रशासनाला इंद्राणीला हजर करण्याचे आदेश दिले होते.