इलेक्ट्रोहोमिओपाथ चिकित्सकांना उपचार करण्याची परवानगी देणारा अध्यादेश राज्य सरकारने लागू केला आहे.
मुंबई : इलेक्ट्रोहोमिओपाथ चिकित्सकांना उपचार करण्याची परवानगी देणारा अध्यादेश राज्य सरकारने लागू केला आहे. त्यानुसार राज्यातील जवळपास ३० हजार इलेक्ट्रोहोमिओपाथ चिकित्सकांना याचा थेट फायदा होणार आहे. या निर्णयाचे भावना मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रोहोमिओपाथ संघटनेचे अध्यक्ष सतीश जगदाळे यांनी स्वागत केले आहे.
८० ते ९०च्या दशकामध्ये इलेक्ट्रोहोमिओपाथचे प्रशिक्षण देणा-या संस्था मोठय़ा प्रमाणात देशात सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र या उपचारपद्धतीसाठी कोणतीही नियामक संस्था अस्तित्वात नव्हती. ती स्थापन करण्याची सूचना तेव्हा केंद्र सरकारने दिली होती. मात्र त्यापूर्वीच या प्रशिक्षण संस्थांवर बंदी घालण्यात आली.
त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात गेले होते. त्याच वेळी या विद्यार्थ्यांना एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम देऊन वैद्यकीय व्यवसायाची परवानगी देण्यात यावी, अशी शिफारस करण्यात आली होती. ती राज्य सरकारने स्वीकारली होती.
मात्र केंद्राने ती फेटाळली होती. तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित होते. हे प्रकरण नंतरच्या काळात न्यायालयात गेले. तिथे इलेक्ट्रो होमिओपाथ चिकित्सकांना न्याय मिळाला. त्यांना वैद्यकीय व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली. तो निकाल राज्य सरकारने मान्य करत आता राज्यातील इलेक्ट्रो होमिओपाथ चिकित्सकांना वैद्यकीय व्यवसाय करण्याची परवानगी देऊ केली आहे.