‘इसीस’च्या संशयित दहशतवादी कल्याणचा तरुण आरिफ माजिदला त्याचे पुढील शिक्षण पूर्ण करण्याची परवानगी राष्ट्रीय तपास पथकाच्या विशेष न्यायालयाने दिली आहे.
मुंबई- ‘इसीस’च्या संशयित दहशतवादी कल्याणचा तरुण आरिफ माजिदला त्याचे पुढील शिक्षण पूर्ण करण्याची परवानगी राष्ट्रीय तपास पथकाच्या विशेष न्यायालयाने दिली आहे.अभ्यासक्रमाची सर्व पुस्तके उपलब्ध करून देण्याचेही आदेश तुरुंग प्रशासनाला न्यायालयाने दिले. पुस्तकांसह त्याच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगीही न्यायालयाने दिली आहे. दरम्यान, आरिफची न्यायालयीन कोठडी चौदा दिवसांनी वाढवण्यात आली आहे.
शिक्षण पूर्ण करण्याची व कुटुंबीयांना भेटण्यासाठी आरिफने अर्ज केला होता. राष्ट्रीय तपास पथकाच्या विशेष न्यायालयासमोर अर्जाची सुनावणी झाली. शिक्षण पूर्ण करण्यासाठी अभ्यासक्रमाची पुस्तके देण्याची त्याची मागणी होती. तसेच कुटुंबीयांना भेटण्याची, वापरण्यात येणा-या कपडय़ांची अतिरिक्त जोडी देण्याचीही मागणी त्याने केली होती. विशेष न्यायालयाने आरिफच्या या मागण्या मान्य केल्या आहेत.
दरम्यान, आरिफला तुरुंगात भेटण्याची किंवा तुरुंगातच चौकशी करण्याची परवानगी नसताना एका तुरुंग अधिका-याने त्याच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आरिफचे वकील अॅड. खान अब्दुल वहाब यांनी न्यायालयाकडे केली. त्या तुरुंग अधिका-याने जवळपास ५० परदेशी नागरिकांचे छायाचित्र दाखवून त्यांच्यापैकी कोणाला ओळखत असल्याचे आरिफला विचारले होते. आरिफला ज्या कोठडीत ठेवले आहे, त्या तुरुंगाचे सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध करून देण्यासाठी अॅड. खान यांनी न्यायालयात अर्ज केला आहे. तसेच आरिफला एकांत कारावासात ठेवू नये, अशी मागणीही अॅड. खान यांनी केली आहे. दरम्यान, या दोन्ही अर्जावर न्यायालयाने नोटीस बजावली आहे. आरिफची न्यायालयीन कोठडी संपल्यामुळे त्याला कडक सुरक्षा व्यवस्थेत न्यायालयात हजर करण्यात आले होते.